ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी कालवश

आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या पाच दिवसांपासून ते रुग्णालयात होते. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी कालवश
Published on

मुंबई : आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या पाच दिवसांपासून ते रुग्णालयात होते. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती त्यांच्या व्यवस्थापकाने दिली.

बॉलीवूडमध्ये गेली पाच दशके कार्यरत असलेल्या असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ मध्ये जयपूरला झाला. जयपूरच्या सेंट झेवियर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शिक्षण संपल्यानंतर ते रेडिओ कलाकार म्हणून काम करू लागले. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हरे कांच की चूड़ियां’ या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. मोठ्या संघर्षानंतर जया भादुरी या मुख्य अभिनेत्री असलेल्या ‘गुड्डी’ चित्रपटातून त्यांना चांगली भूमिका मिळाली. हा चित्रपट चालल्याने असरानी यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले. पण, तरीही त्यांचा संघर्ष थांबला नाही.

असरानी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मला लोक व्यावसायिक अभिनेता समजत नव्हते. त्यांचा चेहराच वेगळा आहे. तो व्यावसायिक अभिनेत्याचा नाही, असे ज्येष्ठ दिग्दर्शक गुलजार यांनी सांगितले होते. पण, मी दर्जेदार अभिनय करू लागल्यानंतर मला कधीच पाठी वळून बघावे लागले नाही.

१९६० च्या दशकापासून त्यांनी अभिनय कारकीर्दीला प्रारंभ केला. जवळपास ४०० हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले.

‘शोले’ चित्रपटातील त्यांची ‘इंग्रजाच्या काळातील जेलर’ ही भूमिका प्रेक्षकांना अजूनही हसवते. ‘खट्टा मीठा' आणि ‘चुपके चुपके' आदी चित्रपटातील त्यांची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. कोशिश (१९७३), बावर्ची (१९७२), चुपके चुपके (१९७५), छोटी सी बात (१९७५) आदी चित्रपटात त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाची झलक दाखवली.

logo
marathi.freepressjournal.in