नवी दिल्ली/कोलकाता : सुरक्षा, मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ८ ऑक्टोबर रोजी मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एक्स’वर ही माहिती दिली. सुवर्णकमळ आणि १० लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप असून चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
'मृगया'ने ओळख दिली
'मृगया' या १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना व्यापक ओळख मिळाली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. ‘डिस्को डान्सर’ या १९८२ मधील चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. १०० कोटी क्लबमध्ये गेलेला हा हिंदी सिनेसृष्टीतीला पहिला चित्रपट आहे.
त्यानंतर १९९८ मध्ये आलेल्या ‘स्वामी विवेकानंद’ चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांनी रामकृष्ण परमहंस ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मणिरत्नम दिग्दर्शित ‘गुरू’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या माणिकदास गुप्ता या पात्राच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. आता चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
भाजपचे सदस्य असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण किताबानेही सन्मानित करण्यात आले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिथुन चक्रवर्ती यांचे अभिनंदन केले आहे. मिथुन चक्रवर्ती हे सांस्कृतिक प्रतिमा आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.