
मराठी सिनेमाचा सुपस्टार म्हणून अभिनेता भरत जाधव ओळखला जातो. सध्या भरत जाधव एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्यात तो संताप व्यक्त करताना दिसत आहे. रत्नागिरीत शनिवारी रात्री 10 वाजता भरत जाधवच्या 'तू तू मी मी' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, या नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात झाली त्यावेळी रत्नागिरीच्या नाट्यगृहात साऊंड सिस्टीम नव्हती, तसेच नाट्यगृहाची वातानुकुतील व्यवस्था देखील बंद होती. यावेळी प्रेक्षकांना तसेच नाट्यकर्मींना याचा मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. भरत जाधव या व्हिडिओतून याविषयीचा संताप व्यक्त करताना दिसत आहे.
रत्नागिरीत येथे सुरु असलेल्या नाटकातील प्रयोगादरम्यानच्या व्हायरल व्हिडिओत भरत जाधव हा संताप व्यक्त करताना दिसून येत आहे. यावेळी तो म्हणतो की, "एसी नसल्याने काय होत ते आमच्या भूमीकेतून पहा. तु्म्ही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता?" अशा प्रकारे त्यांने नाट्यगृहातील भीषण अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे. यात तो पुढे म्हणाला की, "यापुढे पुन्हा मी रत्नागिरीत प्रयोग करणार नाही." असे म्हणत त्याने प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आहे. हा व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यातील नाट्यगृहांची अवस्था दयनीय आहे. यावर अनेक कलाकारांनी आवाज उठवला आहे. अभिनेता वैभव मांगलेने देखील नाशिक येथील नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर एक पोस्ट लिहीली होती. यात त्याने नाशिकमधील एकाही नाट्यगृहाची वातानुकुतील व्यवस्था सुरु नसल्याचे म्हटले होते. तसेच प्रेक्षक डास आणि उकाड्यात प्रयोग पाहत होते. तसेच रंगमंचावर एवढ्या उकाड्यात काम करताना प्रचंड त्रास झाल्याचे देखील त्याने सांगितले होते. यावरुन राज्यातील नाट्यगृहांच्या अवस्था लक्षात येते.
आजवर अनेक कलाकरांनी तसेच रंगकर्मींनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर भाष्य केले आहे. मात्र त्यांच्या मागणीकडे आजवर दुर्लक्ष होत आले आहे. नुकतेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक पार पडली. यात अभिनेते प्रशांत दामले यांची नवनिर्वाचीत अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दामले यांच्यामुळे नाटकर्मींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आतातरी राज्यातील नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणार का? याकडे नाट्यकर्मी तसेच प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.