जुन्या गाण्यांना नवीन टच देणारे तुम्ही कोण - रहमान

मी जितके अधिक रिमिक्स पाहतो, तितके ते मला अधिक विकृत वाटतात. जुन्या गाण्यांना नवीन टच दिल्याचे लोक म्हणतात. पण...
जुन्या गाण्यांना नवीन टच देणारे तुम्ही कोण - रहमान
Published on

नेहा कक्करच्या 'ओ सजना' या गाण्याने चांगलाच वाद निर्माण केला आहे. फाल्गुनी पाठकच्या 'मैने पायल है छनकाई' या लोकप्रिय गाण्याचा हा रिमेक आहे. फाल्गुनी पाठकच्या गाण्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे नेहा कक्करने एका चांगल्या गाण्याचा रिमेक करून त्याची वाट लावली असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. केवळ नेटकरीच नाही तर खुद्द फाल्गुनीनेही या रिमेकवर नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता संगीत जगतातील दिग्गज ए.आर.रेहमान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत रेहमानने रिमिक्स कल्चरबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी नेहाचे नाव न घेता निशाणा साधला. “मी जितके अधिक रिमिक्स पाहतो, तितके ते मला अधिक विकृत वाटतात. जुन्या गाण्यांना नवीन टच दिल्याचे लोक म्हणतात. पण हा नवा टच देणारे तुम्ही कोण? मी नेहमी इतर लोकांच्या कामाबद्दल जागरूक असतो. तुम्ही इतरांच्या कामाचा आदर केला पाहिजे,” असे ते म्हणाले.

ए.आर. रहमान यांनी त्यांच्या विधानात स्पष्ट केले की ते रिमिक्स संस्कृतीचे समर्थन करत नाहीत. मूळ कामावर त्यांचा अधिक भर असतो. फाल्गुनी पाठकची गाणी ९० च्या दशकात प्रचंड हिट झाली होती. ती गाणी आजही अनेकांच्या हिटलिस्टमध्ये समाविष्ट आहेत.

नवीन व्हर्जन ऐकून काय होती फाल्गुनी ची प्रतिक्रिया ?

मूळ गाण्याचे हक्क माझ्याकडे नाहीत, अन्यथा मी कायदेशीर कारवाई केली असती, अशी प्रतिक्रिया फाल्गुनीने दिली. अनेकांनी मला सांगितले की त्यांना हा रिमेक आवडला नाही. कदाचित त्या वेळी मला गाण्याच्या अधिकाराबद्दल समजले असते तर बरे झाले असते. असे फाल्गुनीने सांगितले. 

logo
marathi.freepressjournal.in