Ex-President Donald Trump's Rally In Pennsylvania: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचे अनेक व्हिडीओमधून दिसून येत आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात हल्लेखोर आणि एक ट्रम्प समर्थक ठार झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध केला आहे.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. सध्या ट्रम्प आणि बिडेन निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत आणि याच दरम्यान हा हल्ला झाला. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी शनिवारी त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की "अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही."
अनेक राऊंड गोळीबार
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीमध्ये एकापाठोपाठ अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसने त्याला तत्काळ घटनास्थळाच्या बाहेर नेले.
ट्रम्प सुरक्षित आहेत
सीक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्प यांचे प्रवक्ते या दोघांनी सांगितले की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ठीक आहेत. ट्रम्पचे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "ते ठीक आहेत आणि स्थानिक डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे."
हल्ल्यात शूटरसह २ जण ठार
अमेरिकन मीडियानुसार, ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयित शूटरसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टन पोस्टनुसार, "बटलर काउंटीचे जिल्हा ऍटर्नी रिचर्ड गोल्डिंगर म्हणाले की, दोन जण मारले गेले, त्यात एका शूटरचा समावेश आहे." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.