तिबेटमध्ये भूकंपात १२६ ठार; १८० हून अधिक जखमी

चीनच्या तिबेट प्रांतात झिगेजमधील डिंगरी परगण्याला मंगळवारी सकाळी ६.८ रिक्टर स्केल इतक्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसल्याने १२६ जण ठार झाले असून १८० हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर हजारो घरांचे नुकसान झाले आहे.
तिबेटमध्ये भूकंपात १२६ ठार; १८० हून अधिक जखमी
एक्स @snehamordani
Published on

बीजिंग : चीनच्या तिबेट प्रांतात झिगेजमधील डिंगरी परगण्याला मंगळवारी सकाळी ६.८ रिक्टर स्केल इतक्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसल्याने १२६ जण ठार झाले असून १८० हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर हजारो घरांचे नुकसान झाले आहे. नेपाळच्या सीमेजवळील तिबेटच्या पठार प्रदेशाला भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की शेजारच्या नेपाळमधील इमारतींनाही जोरदार हादरे बसले. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर सैरावैरा पळाले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बाधित क्षेत्रात मदतकार्य वेगाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळलाही भूकंपाचे हादरे बसल्याने २०१५ मध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे अनेकांना स्मरण झाले. त्यावेळी नेपाळमध्ये नऊ हजार जण ठार झाले होते.

डिंगरी परगण्याला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर चीनच्या प्रशासनाने दुसऱ्या स्तरावरील आपत्कालीन सेवा सुरू करण्यासाठी पावले उचलली असून आपत्कालीन मदत पथके रवाना केली आहेत. झिझांग स्वायत्त प्रांतानेही दुसऱ्या स्तरावरील आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कापडी तंबू, कोट, दुमडता येणाऱ्या खाटा व अन्य विशेष मदत साहित्य अशा जवळपास २२ हजार वस्तू मध्यवर्ती यंत्रणेने तातडीने रवाना केल्या आहेत. त्याचप्रमाणे १५०० हून अधिक स्थानिक अग्निशामक कर्मचारी आणि मदत पथकही रवाना करण्यात आले.

झिगेज हा भारताच्या सीमेजवळचा भाग आहे. झिगेज हे तिबेटमधील धार्मिक शहर म्हणूनही ओळखले जाते. डिंगरी परगण्यातील त्सोगो शहरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याच्या २० किमी परिघात साधारणपणे ६,९०० इतकी लोकसंख्या आहे. मात्र अधिकृत माहितीनुसार, येथील लोकसंख्या ६१ हजारांहून अधिक आहे. या परिसरामध्ये २७ गावे आहेत. ईशान्य नेपाळच्या खुंबू हिमालय पर्वतराजींमधील लोबुस्ते येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे चीनच्या भूकंपविषयक केंद्राकडून सांगण्यात आल्याचे वृत्त झिनुआ वृत्तसंस्थेने दिले आहे. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने हा भूकंप ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याचे नोंदवले आहे, तर चीनने हा भूकंप ६.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याचे म्हटले आहे.

बिहार, पश्चिम बंगाल, आसाममध्येही धक्के

पाटणा आणि सारणसह बिहारच्या काही भागांमध्ये तसेच पश्चिम बंगाल आणि आसामच्या काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात भूकंपानंतर लोक घराबाहेर पडताना आणि बाहेर उघड्यावर उभे असल्याचे दिसत आहे. बिहारच्या मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझफ्फरपूर येथे सकाळी ६.४० च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले.

नेपाळमध्येही जाणवले धक्के

नेपाळमध्येही या भूकंपाचे जोरदार हादरे बसल्याने नागरिक भयभीत होऊन घरातून बाहेर पडले आणि सैरावैरा पळू लागले. काठमांडूमध्येही काही नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. इमारती, झाडे आणि विजेच्या तारा काही वेळ हलत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. तथापि, या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. नेपाळमध्ये २०२५ ची सुरुवात भूकंपाच्या धक्क्यांनी झाली आहे. नेपाळमध्ये गेल्या ७ दिवसांत ३ वेळा भूकंप झाला आहे. यामध्ये ३ जानेवारीला झालेल्या भूकंपाची ४.४ रिक्टर स्केल एवढी होती, तर २ जानेवारीच्या भूकंपाची तीव्रता ४.८ रिक्टर स्केल इतकी होती.

logo
marathi.freepressjournal.in