क्युबात विचित्र चोरी, ३० जणांनी चोरले तब्बल १३३ टन चिकन; खरेदी केल्या चैनीच्या वस्तू

या ३० जणांनी चोरलेले चिकन सरकारी वितरण व्यवस्थेतून सामान्य जनतेला मिळणे अपेक्षित होते.
क्युबात विचित्र चोरी, ३० जणांनी चोरले तब्बल १३३ टन चिकन; खरेदी केल्या चैनीच्या वस्तू

हवाना : आर्थिक संकटात असलेल्या क्युबात ३० चोरांनी तब्बल १३३ टन चिकनची चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी चिकन पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे कृत्य केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी चोरीतून मिळालेल्या पैशातून लॅपटॉप, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर अशा चैनीच्या वस्तू विकत घेतल्या आहेत.

क्युबामध्ये अद्याप जुन्या साम्यवादी राजवटीचे अवशेष शिल्लक असून बहुतांश जनता सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून मिळणाऱ्या रेशनवर गुजराण करते. रेशन दुकानांतून नागरिकांना चिकन (कोंबडीचे मांस) सवलतीच्या दरांत वितरीत केले जाते. सरकारी वितरण व्यवस्थेशी जोडल्या गेलेल्या अशाच एका चिकन कंपनीत ही विचित्र चोरी झाली आहे. त्यात कंपनीचे कर्मचारी, शिफ्ट सांभाळणारे बॉस, आयटी विभागातील कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि कंपनीबाहेरील काही व्यक्तीही सहभागी आहेत. या ३० जणांनी काही दिवसांपूर्वी रात्री १२ ते २ वाजण्याच्या सुमारास कंपनीतून १३३ टन चिकन चोरले. ते १६६० खोक्यांत भरून रातोरात ट्रक्समधून कंपनीबाहेर नेले. त्याची काळ्या बाजारात विक्री करून भरपूर पैसा मिळवला. त्या पैशातून लॅपटॉप, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर अशा चैनीच्या वस्तू खरेदी केल्या. क्युबातील जनता सध्या अन्नाला महाग झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा वस्तू म्हणजे भलतीच चैन आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीचा तपास करत आहेत, कारण चिकनचे बॉक्सेस कोल्ड-स्टोरेजमधून पळवण्यात आले आहेत. हे चोर पकडले गेल्यास त्यांना २० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या ३० जणांनी चोरलेले चिकन सरकारी वितरण व्यवस्थेतून सामान्य जनतेला मिळणे अपेक्षित होते. चोरीला गेलेले चिकन थोडेथोडके नव्हे, तर चक्क १३३ टन होते. क्युबातील कॉपमार या सरकारी वितरण व्यवस्थेचे संचालक रिगोबर्टो मस्टेलियर यांनी सांगितले की, चोरीला गेलेल चिकन क्युबातील एखाद्या मध्यम आकाराच्या प्रांतातील नागरिकांना एक महिनाभर पुरेल इतके होते. सरकारी वितरण यंत्रणेतून नागरिकांना मिळणाऱ्या अन्नधान्याचा पुरवठा बराच घटला आहे. रोजच्या वापराचे जिन्नस मिळवण्यासाठी लोकांना कित्येकदा काही दिवस किंवा काही आठवडे थांबावे लागते. क्युबावासीयांची सरासरी मासिक मिळकत केवळ ४,२०९ पेसो किंवा १४ डॉलर्सवर घसरली आहे. त्यामुळे त्यांना दिवसातून दोन वेळा पोट भरणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. थोड्याशा सुखासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार होत आहेत.

साम्यवादी गड ते उपासमारीची रड

क्युबा हा अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून अवघ्या ९० मैलांवर कॅरेबियन समुद्रात वसलेल्या लहानशा बेटाचा देश. शीतयुद्धाच्या काळात फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली अगदी अमेरिकेच्या दारात असलेला साम्यवादी गड. मात्र, अनेक दशके साम्यवादी प्रभावाखाली असल्याने तेथे खासगी उद्योगक्षेत्र फारसे विकसित झालेले नाही. अर्थव्यवस्थेचा संकोच झाला आहे. सरकारच्या धोरणात्मक चुका, अनेक दशके चालत आलेले अमेरिकी निर्बंध, कोरोनाकाळातील लॉकडाऊन, व्हेनेझुएलाकडून कमी दरात होणारा खनिज तेलाचा पुरवठा थांबणे आदी कारणांमुळे आज हा देश गंभीर आर्थिक अडचणीतून जात आहे. तेथील सरकारने २०२१ साली पेसो या चलनाचे अवमूल्यन केल्यानंतर परिस्थिती आणखीच बिघडली आहे. महागाईचा दर ३० टक्क्यांच्या वर गेला आहे. देशात अन्नधान्य, इंधन, औषधे आदी जीवनावश्यक बाबींचा तुटवडा निर्माण होऊन त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in