आइसलँडमध्ये २४ तासांत १४०० भूकंप - जमीन ९ सेमीने वर उचलली गेली, आणीबाणी घोषित

आइसलँडच्या नैऋत्य किनाऱ्यावरील रेकजेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखी प्रणालीचा समावेश आहे.
आइसलँडमध्ये २४ तासांत १४०० भूकंप - जमीन ९ सेमीने वर उचलली गेली, आणीबाणी घोषित
Published on

रेक्यवीक : उत्तर अटलांटिक महासागरात युरोपच्या वायव्येकडे वसलेल्या आइसलँड या बेटाला गुरुवारी आणि शुक्रवारी २४ तासांत १४०० भूकंपाचे धक्के बसले असून तेथील जमीन सर्वसामान्य पातळीपेक्षा ९ सेंटीमीटरने वर उचलली गेली आहे. शास्त्रज्ञांनी तेथे ज्वालामुखीच्या उद्रेकाचा इशारा दिला आहे. तसेच प्रशासनाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.

रेकजेनेस द्वीपकल्पावरील माऊंट थॉर्बजॉर्नच्या आसपासचा भाग जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर अंतरावर ज्वालामुखीचा मॅग्मा तयार झाल्यामुळे दोन आठवड्यांहून अधिक काळ दररोज शेकडो लहान भूकंपांनी हादरत आहे. २७ ऑक्टोबरपासून या प्रदेशातील जमीन ९ सेंटीमीटरने उचलली गेली आहे. हे मॅग्मा पृथ्वीच्या कवचातून फुटत असल्याचे संकेत असू शकतात, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

आइसलँडच्या नैऋत्य किनाऱ्यावरील रेकजेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखी प्रणालीचा समावेश आहे. तो ८०० वर्षे निष्क्रिय राहिल्यानंतर २०२१ सालापासून जागृत जाला आहे. तेव्हापासून त्याचा तीन वेळा उद्रेक झाला आहे. पूर्वीचे उद्रेक दुर्गम खोऱ्यांमध्ये झाले होते. त्यामळे फारसे नुकसान झाले नव्हते. सध्या पुन्हा तयार होत असलेला मॅग्मा स्टोरेज चेंबर ब्लू लगूनपासून ३ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर फुटण्याची शक्यता आहे. ब्लू लगून जिओथर्मल स्पा आइसलँडच्या सर्वात मोठ्या पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे पावणेचार लाख आहे.

logo
marathi.freepressjournal.in