
सिंगापूर : पाच वर्षांपूर्वी जगाला हादरवणारा कोरोना पुन्हा आला आहे. या विषाणूचे संक्रमण हाँगकाँग, सिंगापूरमध्ये वाढले आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे १४,२०० रुग्ण झाले असून हाँगकाँगमध्ये ३१ रुग्ण आहेत. त्यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा निश्चित आकडा उघड झालेला नाही.
हाँगकाँगने कोरोनाचा पहिला रुग्ण कधी आढळला याची माहिती दिली नाही, तर सिंगापूरने कोरोनाबाबत दक्षतेचा इशारा जारी केला आहे.
सिंगापुरात कोरोना रुग्णांची संख्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ११,११० होती. ती मेच्या पहिल्या आठवड्यात १४,२०० रुग्ण झाली. सिंगापूरमध्ये रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाली आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा दिला की, महामारी पुन्हा विक्राळ रुप धारण करू शकते. त्याचा परिणाम आशियातील विविध देशांमध्ये दिसू शकतो.
हाँगकाँगचे संसर्गजन्य आजारांचे आरोग्य अधिकारी अल्बर्ट अऊ यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढत आहे. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना कोविड पॉझिटिव्ह होण्याची शक्यता अधिक आहे.
चीन, थायलंडमध्ये अलर्ट
चीन व थायलंडमध्ये कोविडबाबत सरकार अतिदक्ष आहे. चीनमध्ये आजारांची तपासणी करायला जाणाऱ्या रुग्णांमध्ये कोविड विषाणू सापडण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. लोकांना बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चीनच्या रोग आणि प्रतिबंधक केंद्राच्या आकड्यानुसार, कोविडची साथ मोठ्या प्रमाणात पसरू शकते. थायलंडमध्ये वेगवेगळ्या भागात कोविडचे रुग्ण वाढत आहेत.