पाकिस्तानमध्ये बस अपघातात १८ ठार

भाजलेल्या अवस्थेत १६ जणांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले
पाकिस्तानमध्ये बस अपघातात १८ ठार

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी सकाळी एका बसला लागलेल्या आगीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. लाहोरपासून सुमारे १४० किमी अंतरावर फैसलाबाद मोटरवेच्या पिंडी भटियान शहरात पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

पिकअप व्हॅनला धडकल्यानंतर बसने पेट घेतला. कराचीहून इस्लामाबादला जात असलेल्या या बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात, दोन्ही वाहनांच्या चालकांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. इंधन टाकी घेऊन जाणाऱ्या व्हॅनला पिंडी भाटियान विभागात बसने पाठीमागून धडक दिली. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजलेल्या अवस्थेत १६ जणांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. बसमधून उडी मारण्यात यशस्वी झालेल्या प्रवाशांचा जीव वाचला. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसले, तरी अपघाताच्या वेळी बसचालक झोपला असावा किंवा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला असावा, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

“व्हॅनमध्ये इंधन टाकी नसती तर दोन्ही वाहनांना आग लागली नसती. ज्यांनी जीव गमावला, त्यांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवली जाईल, त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल,” असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in