गाझात इस्रायलचे २१ सैनिक ठार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी २१ सैनिकांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.
गाझात इस्रायलचे २१ सैनिक ठार

जेरूसलेम : इस्रायल व गाझापट्टीत गेल्या तीन महिन्यांपासून युद्ध सुरू असून इस्रायली सैन्याला मंगळवारी मोठा धक्का बसला. मंगळवारी मध्य गाझा परिसरात त्यांचे २१ सैनिक ठार झाले. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायली सैन्याचे झालेले हे सर्वात मोठे नुकसान आहे.

लष्कराचे मुख्य प्रवक्ते रियर ॲॅडमिरल डॅनियल हेगारी म्हणाले की, सैनिक मध्य गाझा परिसरात सोमवारी दोन घरे उद‌्ध्वस्त करण्यासाठी स्फोटके लावत होते. तेव्हा एका दहशतवाद्याने रॉकेट डागले. त्यामुळे या स्फोटकांचा स्फोट झाला. यात इमारती कोसळल्या. त्यामुळे सैनिक इमारतीच्या मलब्याखाली दबून मरण पावले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी २१ सैनिकांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. पूर्ण विजय मिळेपर्यंत लष्कर लढतच राहील. युद्धाची सुरुवात झाल्यापासून सोमवारचा दिवस अधिक कठीण होता. आमचे २१ सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा तपास लष्कर सुरू करणार आहे.

गाझातून २० लाख जण विस्थापित

इस्रायलच्या तुफान बॉम्बफेकीमुळे आतापर्यंत गाझातून २० लाख जण विस्थापित झाले आहेत. या भागात सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर असल्याने हमास दहशतवाद्यांविरोधात आम्ही कारवाई पूर्ण सतर्कतेने करू, असे इस्रायलच्या सैन्य दलाने सांगितले.इस्रायलचे संरक्षण मंत्री याव गॅलेंट यांनी सांगितले की, इस्रायली सैन्यदल खान युनिस भागात आपले हल्ले अधिक तीव्र करणार आहे. हमासचे म्होरके मोहम्मद दीफ आणि याह्या सिनवार हे इस्रायली ओलिसांसोबत लपले आहेत. इस्रायलच्या सैन्याने दोन महिन्यांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्या बदल्यात हमासला सर्व ओलिसांना सोडावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in