

दुबई : इराणने व्यापारी जहाजे तसेच तेल आणि वायू प्रकल्पांवर सुरू केलेले हल्ले त्वरित थांबवावेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करावी, असे आवाहन शनिवारी जगातील २२ देशांनी मिळून केले आहे.
संयुक्त अरब अमिराती, बाहरीन, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख देशांनी इराणच्या आक्रमकतेचा तीव्र निषेध केला आहे. या देशांनी इराणने व्यापारी जहाजांवर केलेले हल्ले हे जागतिक सुरक्षेसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.
इराणच्या या कृत्याचे परिणाम संपूर्ण जगाला, विशेषतः गरीब आणि असुरक्षित देशांना सोसावे लागतील, असे या २२ देशांनी शनिवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक तेल पुरवठा आणि व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमच्याकडे तेल नाही : इराणने केले हात वर
तेहरान : जगातील बाजारात आणण्यासाठी आमच्याकडे अतिरिक्त तेल उपलब्ध नाही. जे होते ते कंटेनरमध्ये लादले आहे, असे सांगून इराणने हात वर केले आहेत. इराणच्या तेल खात्याने अमेरिकेच्या या निर्णयाचे खंडन केले आहे. मुंबईस्थित इराणच्या वाणिज्य दूतावासाने सांगितले की, अतिरिक्त तेल देणे शक्य नाही. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांची वक्तव्ये केवळ खरेदीदारांना दिलासा देणारी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.