कॅनडाकडून विद्यार्थी व्हिसात दोन वर्षांसाठी ३५ टक्के कपात; भारतीयांवर परिणाम होण्याची शक्यता

कॅनडात मोठ्या संख्येने येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था करणे हे तेथील सरकारसाठी आव्हान आहे.
कॅनडाकडून विद्यार्थी व्हिसात दोन वर्षांसाठी ३५ टक्के कपात; भारतीयांवर परिणाम होण्याची शक्यता
Published on

ओटावा : आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसांमध्ये पुढील दोन वर्षे कपात करण्यात येणार असल्याची घोषणा कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली. सध्या जारी करण्यात येणाऱ्या वार्षिक व्हिसांमध्ये तूर्तास ३५ टक्के कपात करत असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाचा भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

कॅनडात मोठ्या संख्येने येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था करणे हे तेथील सरकारसाठी आव्हान आहे. इतक्या प्रमाणात दरवर्षी घरांचे नियोजन करणे कठीण जाते. परिणामी कॅनडात गृहसंकट उपस्थित झाले आहे. त्याचा सामना करण्यासाठी प्रामुख्याने हा निर्णय घेतला जात आहे. तसेच कॅनडात प्रवेश करणाऱ्या अवैध नागरिकांना आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याचाही उद्देश त्यामागे आहे, असे कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी सांगितले.

कॅनडात २०२२ साली ८ लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना तात्पुरता अभ्यास व्हिसा जारी करण्यात आला. कॅनडातील अभ्यास परवानाधारकांच्या पहिल्या दहा देशांच्या यादीत भारत अव्व्ल स्थानावर होता. त्या वर्षी भारतातून एकूण ३ लाख १९ हजार विद्यार्थी कॅनडात गेले होते. गेल्या वर्षी असे सुमारे ५ लाख ६० हजार व्हिसा जारी करण्यात आले होते. सन २०२४ मध्ये त्यात ३५ टक्के कपात करून ३ लाख ६४ हजार परवाने दिले जातील, अशी अपेक्षा आहे. सन २०२५ साठी या यंत्रणेचे पुनर्मूल्यांकन करून नवा व्हिसा कोटा जारी केला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in