इराणमध्ये सहा महिन्यांत ३५४ जणांना मृत्युदंड

मानवी हक्क संघटनेचा अहवाल, चीननंतर जगात दुसरा क्रमांक
इराणमध्ये सहा महिन्यांत ३५४ जणांना मृत्युदंड
Published on

तेहरान : इराणमध्ये गेल्या सहा महिन्यांत ३५४ जणांना मृत्युदंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती मानवी हक्क संघटनांनी उघड केली आहे. याबाबतीत इराण हा चीनखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.

इराणमधील कट्टर इस्लामी राजवटीविरोधात गेल्या वर्षभराहून अधिक काळ नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाब व्यवस्थित परिधान केला नसल्याच्या कारमावरून पोलिसांनी माशा अमिनी या तरुणीला जबर मारहाण केली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर इराणमध्ये मोठा जनक्षोभ उसळला. हे जनआंदोलन चिरडण्यासाठी इस्लामी राजवटीने अनेकांना देहदंड दिला.

नॉर्वेस्थित इराण ह्युमन राइट्स या मानवी हक्क संघटनेने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, इराणमधील राजवटीत जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यांच्या काळात ३५४ जणांना ठार मारले. त्यात राजकीय विरोधकांपासून, आंदोलनकर्ते आणि सामान्य गुन्हेगारांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. मृत्युदंड दिलेल्यांमध्ये इराणी वंश सोडून अन्य लोकांचा प्रामुख्याने समावेश आहे. मारले गेलेल्यांपैकी २० टक्के लोक हे सुन्नी बलुच अल्पसंख्याक समुदायाचे होते. गेल्या सहा महिन्यांत जीव गमवावा लागलेल्यांमध्ये सहा महिलाही होत्या, तर दोन पुरुषांना जाहीररीत्या फाशी देण्यात आली. अमली पदार्थविषयक गुन्ह्यांत २०६ जणांना मृत्युदंड देण्यात आला. इराणी राजसत्तेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी देहदंडाचा वापर केला, असा आरोप इराण ह्युमन राइट्सचे संचालक महमुद अमिरी-मोघद्दम यांनी केला.

गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत इराणमध्ये २६१ जणांना ठार मारण्यात आले होते. यंदा याच कालावधीत त्यात ३६ टक्क्यांची वाढ होऊन तो आकडा ३५४ वर गेला आहे. गेल्या वर्षी एकूण ५८२ लोकांना ठार मारण्यात आले होते. याबाबतीत इराणचा चीनखालोखाल जगात दुसरा क्रमांक लागतो. चीनच्या साम्यवादी राजवटीनेही देहदंडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. मात्र, तेथील नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. अर्थात, ती संख्या खूपच जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in