कराची : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत. यामध्ये पंजाब प्रांतामधील २३ जणांना लक्ष्य करून त्यांना गोळ्या घालून ठार केले गेले. त्याचप्रमाणे रेल्वेमार्गावर घडविण्यात आलेल्या स्फोटात सहा जण ठार झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० झाली आहे, तर २१ दहशतवादी ठार झाल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तात म्हटले आहे.
अज्ञात बंदूकधाऱ्यांनी प्रथम एक बस वाटेतच अडविली आणि प्रवाशांना बसमधून खाली उतरविले आणि त्यांचे ओळखपत्र तपासून त्यानंतर २३ जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. बलुचिस्तानच्या मुसाखेल जिल्ह्यात ही घटना घडली, तर दुसरी घटना बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्यात घडली. दहशतवाद्यांनी पाच नागरिक आणि सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली.
ओळखपत्र तपासून गोळ्या घातल्या
बंदी घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाने राराशीम परिसरातील महामार्ग रोखला आणि बसमधील २३ प्रवाशांना खाली उतरविले, असे ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते ते पोलिसांनी सांगितले नाही. दहशतवाद्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास फर्मावले आणि त्यानंतर त्यांच्याकडील राष्ट्रीय ओळखपत्र तपासून त्यांना गोळ्या घालून ठार केले.
दहशतवाद्यांनी ठार केलेल्यांपैकी बहुसंख्य जण पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील भागातील रहिवासी होते, तर अन्य काही जण खैबर पख्तुन्वा येथील होते. त्यामुळे वांशिक पार्श्वभूमी तपासून या २३ जणांना ठार करण्यात आल्याचे सूचित होत आहे. सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी महामार्गावर अन्य १२ वाहनांना आग लावली आणि ते जवळच्या जंगलात पसार झाले. मुसाखेल येथील हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मीने (बीएलए) स्वीकारली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी २३ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले.
बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी २४ आणि २५ ऑगस्टच्या मध्यरात्री अनेक ठिकाणी हल्ले केल्याचे एका वृत्तवाहिनीने सुरक्षा दलांच्या हवाल्याने सांगितले. पाकिस्तान-इराणला जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर स्फोटकांच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये सहा जण ठार झाले असून त्यांची ओळख पटलेली नाही. क्वेट्टा आणि उर्वरित पाकिस्तानला जोडणाऱ्या रेल्वे पुलावर हा हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांना जरब बसेल अशी कारवाई केली जाईल, असे या नेत्यांनी म्हटले आहे.
२१ दहशतवादी कारवाईत ठार
या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत २१ दहशतवादी ठार झाल्याचा दावा पाकिस्तान लष्कराचा माध्यम विभाग असलेल्या ‘दीइंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने केला आहे.