न्यूयॉर्क : जगात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी बुद्धिमत्तेसमोर आव्हान उभे केले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगातील ४० टक्के नोकऱ्या जाणार आहेत, असा इशारा जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी दिला. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत वार्षिक परिषदेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकरीतील सुरक्षितता कमी होणार आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उत्पादकतेचा स्तर वाढवण्यात तसेच जागतिक विकासाला वाढ देण्यासाठी चांगल्या संधी निर्माण करेल. विकसनशील देशात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव कमी होण्याचा विश्वास वाटतो. मात्र, जागतिक स्तरावर ४० टक्के नोकऱ्यांवर टांगती तलवार उभी राहणार आहे. भविष्यात तुमच्याकडे जितकी उच्च कुशलता असेल, तितक्या चांगल्या नोकऱ्या तुमच्याकडे असतील, असे त्या म्हणाल्या.
तुमची नोकरी पूर्णपणे संपू शकते किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या नोकरीच्या संधी आणखी वाढवू शकते. तुमची कंपनीसाठी अधिक चांगले उत्पादक होऊ शकाल आणि तुमचे उत्पन्न वाढू शकते, असे त्यांनी सांगितले.
कमी उत्पन्न असलेले देश वेगाने वाढण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे हे देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संधी लाभ उठवू शकतील. कृत्रिम बुद्धिमत्ता ही थोडी घाबरवणारी आहे, मात्र सर्वांसाठी नवीन संधी देणारी आहे, असे ते म्हणाले.
२०२४ हे सर्वात अडचणीचे वर्षे
२०२४ हे जगातील महसूल नीतीसाठी अत्यंत अडचणीचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. कारण अनेक देश कोविड महासाथीच्या काळात जमा झालेल्या कर्जाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.