तेल अवीव : गाझा येथे सोमवारी इस्रायलच्या हल्ल्यात किमान ४५ लोक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मृत आणि जखमींमध्ये बहुसंख्य महिला आणि मुले आहेत. हमासने रविवारी इस्रायलच्या तेल अवीव शहरावर रॉकेट्सचा मारा केला होता. त्यानंतर लगेचच इस्रायलने हा हल्ला केला आहे.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जुडिया आणि सामरियामधील हमास चीफ ऑफ स्टाफ आणि हमासचा अतिरिक्त वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. इस्रायलच्या संरक्षणदलांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आणि सांगितले की, त्यांनी राफामधील हमास कंपाऊंडवर हल्ला केला. त्यामध्ये काही वेळापूर्वी हमासचे दहशतवादी कार्यरत होते. इस्रायलच्या विमानांनी गुप्त माहितीच्या आधारावर, अचूक युद्धसामग्री वापरून आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अधीन राहून लक्ष्यांवर हल्ला केला.