ट्रम्प यांच्याविरोधात पुन्हा जोरदार निदर्शने; अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ५० राज्यांमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.
ट्रम्प यांच्याविरोधात पुन्हा जोरदार निदर्शने; अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले
एक्स @MomoTheMelon
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ५० राज्यांमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. नागरिकांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस’ला घेराव घातला. ट्रम्प व एलॉन मस्क यांचे व्यापार धोरण, सरकारी नोकरीत कपात आदींमुळे नागरिक संतापले आहेत.

या आंदोलनाला आंदोलकांनी ‘५०५०१’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ ५० विरोधी प्रदर्शन, ५० राज्य व एक आंदोलन असा आहे.

निदर्शकांनी ‘टेस्ला’च्या शोरुमलाही घेराव घातला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व उद्योगपती एलॉन मस्क यांच्या आक्रमक धोरणांमुळे अमेरिकन नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मस्क यांचा दक्षता विभाग सातत्याने सरकारी विभागांमध्ये नोकर कपात करत आहे. आतापर्यंत हजारो लोकांची सरकारी नोकरी गेली आहे. तर ट्रम्प हे परदेशी नागरिकांवर कारवाई करत आहेत. तसेच कठोर टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेतील महागाई वाढत आहे. वाढीव टॅरिफमुळे अमेरिकेत दुसऱ्या देशांतून येणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. याचा मोठा फटका जनतेच्या खिशाला बसत आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स आजपासून भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स हे उद्यापासून चार दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारताचा दौरा आहे. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या त्यांच्या पत्नी उषा चिलुकुरी-व्हान्स व तीन मुले असतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २६ टक्के ‘जशास तसा’ कर लावला आहे. या पार्श्वभूमीवर व्हान्स यांचा दौरा अत्यंत महत्वाचा ठरला आहे. दिल्लीत मोदी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री व्हान्स यांचे स्वागत करतील. व्हाईट हाऊसने सांगितले की, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स व त्यांचे कुटुंबीय इटली व भारताच्या दौऱ्यावर १८ ते २४ एप्रिलदरम्यान असणार आहेत. या दौऱ्यात ते आर्थिक व भूराजकीय प्राधान्यक्रमावर भारतासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in