
गाझियाबाद : येथे कुत्र्याने चावा घेतल्याने १४ वर्षांच्या मुलाचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. बुलंदशहरमध्ये डॉक्टरांना भेटून परतताना रुग्णवाहिकेत वडिलांच्या मांडीवर मुलाने मान टाकली. एम्सपासून ते सर्व मोठ्या रुग्णालयांनी त्यावर उपचार शक्य नसल्याचे जाहीर केले. कुत्रे पाळणाऱ्या महिलेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.
गाझियाबाद येथे याकुब यांचे कुटुंब चरणसिंग कॉलनी येथे राहते. त्यांचा मुलगा शाहवेज आठवीत शिकत होता. १ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलाला विचित्र वाटू लागले. पाणी पाहून तो घाबरला. खाणेपिणे बंद केले. कधी कधी तोंडातून भुंकल्यासारखे आवाजही येऊ लागले. कुटुंबीयांनी काही डॉक्टरांना दाखवले तेव्हा कळले की, त्याला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला असावा, त्याचा संसर्ग अधिक पसरला आहे.
मुलाचे आजोबा मतलूब अहमद म्हणाले, "आम्ही नातवाला विचारले असता, त्याने सांगितले की, दीड महिन्यापूर्वी शेजारी राहणाऱ्या मावशीच्या कुत्र्याने त्याला चावा घेतला होता. भीतीपोटी त्याने हे घरी सांगितले नाही. त्यामुळे मुलाला लगेच योग्य उपचार मिळू शकले नाहीत. मुलांमध्ये लक्षणे दिसू लागल्यावर आम्हाला कळले."
मतलूब अहमद म्हणाले, "तीन दिवस आम्ही जीटीबी दिल्ली, एम्स दिल्ली आणि मेरठ-गाझियाबाद हॉस्पिटलमध्ये अॅम्ब्युलन्समध्ये फिरत राहिलो. एकाही हॉस्पिटलने आमच्या नातवाला अॅडमिट केले नाही आणि उपचार शक्य नसल्याचे घोषित केले. कोणीतरी आम्हाला सांगितले की, बुलंद शहरमध्ये एक डॉक्टर उपचार करतात. सोमवारी रात्री ८ वाजता आम्ही नातवाला त्या डॉक्टरांना दाखवून रुग्णवाहिकेने गाझियाबादला परतत होतो. वाटेतच नातवाचा मृत्यू झाला."