पाकिस्तानमध्ये त्रिशंकू अवस्था; संयुक्त सरकार स्थापनेचा लष्करप्रमुखांचा सल्ला

विविध प्रकरणांत दोषी आढळल्याने रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेले इम्रान खान यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पाकिस्तानमध्ये त्रिशंकू अवस्था; संयुक्त सरकार स्थापनेचा लष्करप्रमुखांचा सल्ला

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे बहुसंख्य निकाल हाती आले असून त्यात कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे देशहितासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त सरकार स्थापन करावे, असा सल्ला लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी याच आशयाचे विधान केले होते.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या २६५ जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या मतमोजणीनंतर त्यापैकी २५५ जागांचे निकाल पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीय) या पक्षाचे आणि त्याने पाठिंबा दिलेले अपक्ष, असे मिळून १०१ उमेदवार निवडून आले आहेत. त्या खालोखाल नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाला ७३ जागा मिळाल्या आहेत. बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ५४ जागा मिळाल्या, तर मुत्तहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) या पक्षाचा १७ जागांवर विजय झाला. अद्याप १० जागांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. सरकार स्थापनेसाठी एखाद्या पक्षाला २६५ पैकी १३३ जागा जिंकणे आवश्यक आहे. मात्र, हा आकडा कोणत्याही एका पक्षाला गाठता न आल्याने पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत आता त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

सध्या कोणताच पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या अवस्थेत नसल्याने प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त सरकार स्थापन करावे, असे मत शुक्रवारी नवाझ शरीफ यांनी व्यक्त केले होते. शनिवारी लष्करानेही त्याप्रमाणेच विचार व्यक्त केले आहेत. राजकीय पक्ष आणि नेत्यांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून देश आणि नागरिकांच्या हितासाठी एकत्र येऊन संयुक्त सरकार स्थापावे, असे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये कोणत्याही पक्षला बहुमत मिळाले तरी सत्तेची खरी सूत्रे लष्करच हलवत असते. यंदाच्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांना लष्कराचा पाठिंबा असल्याचे वरकरणी दिसत होते. शरीफ यांच्या पाठोपाठ लष्करप्रमुखांनीही एकच मागणी केल्याने, त्याची पुष्टी झाल्याचे भासत आहे.

इम्रान खान यांना किंचित दिलासा

विविध प्रकरणांत दोषी आढळल्याने रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेले इम्रान खान यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रावळपिंडीतील न्यायालयाने शनिवारी इम्रान खान यांना लष्करी आस्थापनांवर हल्ला करण्याच्या १२ प्रकरणांत जामीन मंजूर केला, तर त्यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना अशाच प्रकारच्या १३ प्रकरणांत जामीन मंजूर झाला. या दोघांनाही सायफर केसमध्ये १० वर्षांची शिक्षा झाली आहे, तर इम्रान यांना तोशखाना प्रकरणात प्रथम ३ वर्षांची आणि नंतर १४ वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच त्यांचे लग्न बेकायदा ठरवून ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, इम्रान खान विविध प्रकरणांत कैद असल्याने त्यांचे 'एआय-एनेबल्ड' (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले) भाषण शनिवारी प्रसारित करण्यात आले.

शरीफ यांना पराभूत घोषित करण्याची मागणी

इम्रान खान यांच्या पक्षाने आणि त्यांचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी नवाझ शरीफ यांच्या विजयावर तांत्रिकदृष्ट्या आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे. लाहोर येथील दोन मतदारसंघांतून नवाझ शरीफ आणि त्यांची कन्या मरियम निवडून आले. पण निवडणूक आयोगाने त्यांच्या विजयाचे निकालपत्र 'फॉर्म ४५'वर देण्याऐवजी 'फॉर्म ४७'वर दिले. हे निकालपत्र बोगस असल्याने नवाझ आणि मरियम यांचा निकाल रद्द करावा आणि त्यांना पराभूत घोषित करावे, अशी मागणी विरोधी उमेदवारांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in