इराणचे अध्यक्ष रईसी यांचे अपघाती निधन; परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू

रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसेन अमीरअब्दुल्लाहियन यांच्यासह ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निधन झाल्याचे वृत्त सोमवारी इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी दिले.
इराणचे अध्यक्ष रईसी यांचे अपघाती निधन; परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू
AP

तेहरान : रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसेन अमीरअब्दुल्लाहियन यांच्यासह ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निधन झाल्याचे वृत्त सोमवारी इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी दिले. इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद मुखबीर यांची हंगामी अध्यक्षपदी आणि वरिष्ठ नेते अली बाघेरी यांची हंगामी परराष्ट्र मंत्रिपदी नेमणूक करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसेन अमीरअब्दुल्लाहियन यांच्यासह इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमती, इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे पूर्व अझरबैजानमधील प्रतिनिधी अयातुल्ला मोहम्मद अली अल-हाशीम, रईसी यांच्या अंगरक्षक दलाचे प्रमुख सरदार सईद मेहेदी मुसावी, हेलिकॉप्टरचे वैमानिक कर्नल सईद ताहीर मुस्तफावी, सहवैमानिक कर्नल मोहसीन दर्यानुश आणि हवाई दलाचे तंत्रज्ञ मेजर बेहरुझ घदिमी यांचे निधन झाले. मंगळवारी दिवंगत नेत्यांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्र्यांना आदरांजली वाहण्यासाठी इराणच्या सरकारने पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतानेही इराणशी सहवेदना व्यक्त करण्यासाठी मंगळवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. जगातील प्रमुख देशांच्या नेत्यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अध्यक्ष इब्राहीम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसेन अमीरअब्दुल्लाहियन आणि काही वरिष्ठ अधिकारी रविवारी तीन हेलिकॉप्टरमधून इराण आणि अझरबैजानच्या सीमेवरील किझ कलासी धरणाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलियेव यांची भेट घेतली. त्यानंतर रईसी यांच्या ताफ्यातील तीन हेलिकॉप्टर इराणच्या उत्तरेकडील तब्रिझ शहराकडे निघाले. वाटेत पर्वतमय आणि जंगलाने व्यापलेल्या प्रदेशात खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. दाट धुक्यामुळे रविवारी उशिरापर्यंत बचावदले घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नसल्याने त्यांच्याबाबत नेमके वृत्त हाती येऊ शकले नव्हते. सोमवारी इराणच्या सरकारकडून अध्यक्षांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. रईसी आणि अमीरअब्दुल्लाहियन यांचे पार्थिव सोमवारी तब्रिझ येथे आणण्यात आले. तेथे त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

भारतात एक दिवसाचा दुखवटा

इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपघाती निधनाबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी भारतानेही मंगळवारी (२१ मे रोजी) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मंगळवारी देशभरात सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज निम्म्या उंचीवर फडकावण्यात येईल. तसेच सरकारतर्फे कोणताही करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, असे गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in