अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमी

गेल्या 24 तासांत अफगाणिस्तानात मुसळधार पावसाने १७ लोकांचा मृत्यू झाला असून, अन्य २६ जण जखमी झालेत. मुसळधार पावसामुळे अचानक पूर, भूस्खलन आणि वीज पडण्याच्या घटना घडल्या.
अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमी
अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमीX
Published on

काबूल : गेल्या 24 तासांत अफगाणिस्तानात मुसळधार पावसाने १७ लोकांचा मृत्यू झाला असून, अन्य २६ जण जखमी झालेत. मुसळधार पावसामुळे अचानक पूर, भूस्खलन आणि वीज पडण्याच्या घटना घडल्या. देशाच्या विविध भागांत विशेषतः परवान, दायकुंडी, वारदाक आणि लोगार या प्रांतांमध्ये या घटनांची नोंद झालीय. या पुरामुळे १४७ घरांचे नुकसान झाले असून याव्यतिरिक्त ८० किलोमीटरचे रस्ते वाहून गेले, तर ५८२ एकर शेतजमीन तसेच ३१ कालवे आणि सिंचन व्यवस्था यांना मोठा फटका बसला आहे.

नऊ घरांचे अंशतः नुकसान

प्राथमिक अहवालांनुसार, प्रतिकूल हवामानाचा फटका परवान, वारदाक, दक्षिण कंदाहार, उत्तर जौझजान, फार्याब आणि मध्य बामियान या प्रांतांना बसला होता. या वादळांमुळे नऊ घरांचे अंशतः नुकसान झाले, तसेच ५३० जनावरांचा मृत्यू झाला; यामुळे या कृषीप्रधान भागांतील लोकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला.

बर्फाळ परिस्थितीमुळे अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले होते. गेल्या ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे काबूल, लगमान आणि कपिसा या प्रांतांमधील ७२१ कुटुंबांना फटका बसला होता.

आणखी पावसाची शक्यता

ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम अद्यापही सुरू आहे. अधिक माहिती उपलब्ध होईल, तसतशी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या हवामान विभागाने आगामी दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्यामुळे डोंगराळ आणि संवेदनशील भागांमध्ये पुराचा धोका अधिक वाढू शकतो. यापूर्वी २२ जानेवारी रोजी प्राधिकरणाच्या एका प्रवक्त्याने माहिती दिली होती की, मुसळधार हिमवृष्टी आणि पावसामुळे किमान ११ लोकांचा बळी गेला होता, तर तीन जण जखमी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in