

काबूल : पूर्व काबूलमध्ये रहीमुल्ला दररोज सुमारे दहा तास हातगाडीवर मोजे विकतो. त्यातून त्याला दिवसाला सुमारे ४.५ ते ६ डॉलर कमाई होते. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असली तरी पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याच्याकडे तेवढेच आहे. अनेक अफगाण नागरिकांप्रमाणेच, जगण्यासाठी अफगाण प्रशासनाकडून तसेच आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांकडून मिळणाऱ्या मानवीय मदतीवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांपैकी एक आहे.
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीने लेखात म्हटले की, २०२५ मध्ये सुमारे २२.९ दशलक्ष लोकांना म्हणजे जवळपास निम्म्या लोकसंख्येला मदतीची गरज भासणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय मदतीत मोठ्या प्रमाणावर कपात झाल्याने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न योजनेंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अन्नवाटप कार्यक्रमांसाठी अमेरिकेची मदत थांबविण्यात आल्याने अफगाणी नागरिकांचे जीवन खडतर बनले आहे.
जागतिक अन्न योजनेंतर्गत गेल्या आठवड्यात इशारा दिला की, हिवाळ्यात अफगाणिस्तानातील १.७ कोटींपेक्षा अधिक लोकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागत आहे. जे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ३० लाखांनी अधिक आहे.
अफगाणिस्तान आधीच डळमळीत अर्थव्यवस्था, वारंवार दुष्काळ, दोन प्राणघातक भूकंप आणि इराण व पाकिस्तानसारख्या देशांतून हाकलले गेलेले अफगाण निर्वासित मोठ्या प्रमाणावर परत येत असल्यामुळे अडचणीत सापडला आहे. या सलग धक्क्यांमुळे निवारा आणि अन्नासह मूलभूत साधनसंपत्तीवर प्रचंड ताण आला आहे.
संयुक्त राष्ट्रांचे मानवीय मदत प्रमुख टॉम फ्लेचर यांनी सुरक्षा परिषदेपुढे सांगितले की, अलीकडील भूकंप, मानवीय मदतीच्या प्रवेशावर आणि कर्मचाऱ्यांवर वाढती बंधनांमुळे 'एकावर एक बसणाऱ्या संकटांमुळे' परिस्थिती अधिकच बिघडली आहे. २०२६ मध्ये जवळपास २.२ कोटी अफगाण नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या मदतीची गरज भासेल, मात्र देणगीदारांच्या योगदानात घट झाल्यामुळे त्यांची संस्था सर्वाधिक तातडीच्या, जीव वाचविणाऱ्या मदतीची गरज असलेल्या ३९ लाख लोकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. 'अनेक वर्षांनंतर हा पहिला हिवाळा आहे, ज्यात जवळजवळ कोणतेही आंतरराष्ट्रीय अन्नवाटप नाही,' असे फ्लेचर म्हणाले. परिणामी, २०२५ मधील टंचाईच्या हंगामात सर्वाधिक असुरक्षित लोकांपैकी फक्त सुमारे १० लाख लोकांनाच अन्नसहाय्य मिळाले, तर गेल्या वर्षी हा आकडा ५६ लाख होता. मदत कपातीमुळे संयुक्त राष्ट्रांच्या मानवीय संस्थांसाठी हे वर्ष अत्यंत विनाशकारी ठरले असून हजारो नोकऱ्या आणि खर्चात मोठी कपात करावी लागली आहे.
अफगाणिस्तानला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. पण २०२६ कडे पाहताना, अन्नसुरक्षेचा अभाव, आरोग्याच्या गरजा, मूलभूत सेवांवरील ताण आणि संरक्षणाशी संबंधित धोके वाढत असताना, जीवनरक्षक मदतीत आणखी घट होण्याचा धोका आहे, असे फ्लेचर म्हणाले.
लाखो निर्वासितांच्या परतीमुळे आधीच डगमगणाऱ्या व्यवस्थेवर अधिकच ताण आला आहे. निर्वासित आणि पुनर्वसन व्यवहार मंत्री अब्दुल कबीर यांनी रविवारी सांगितले की गेल्या चार वर्षांत ७१ लाख अफगाण निर्वासित देशात परतले आहेत.
२९ वर्षीय रहीमुल्ला म्हणाला की, २०२१ मध्ये तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तो शेजारच्या पाकिस्तानात पळून गेला होता. दोन वर्षांनंतर त्याला अफगाणिस्तानात परत पाठविण्यात आले. सुरुवातीला त्याला रोख रक्कम आणि अन्नाच्या स्वरूपात मदत मिळत होती.