काबूल/इस्लामाबाद : पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आला असून मंगळवारी रात्रीपासून दोन्ही देशांकडून परस्परांवर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बुधवारी संध्याकाळी राजधानी काबूल आणि स्पिन बोल्दाक येथे बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांनी युद्ध चिघळू नये म्हणून ४८ तासांचा युद्धविराम जाहीर केला आहे.
पाकच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या पेशावर शहरामध्ये ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एका प्लाझामधील एका खोलीला लक्ष्य करण्यात आले. गुप्तचर कारवायांसाठी त्याचा वापर गुप्त कार्यालय म्हणून केला जात असल्याचा दावा केला जात आहे.
परस्परांवर जोरदार हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही युद्धबंदी बुधवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता लागू झाली. दोन्ही देश संवादाद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सांगितले.
पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानातील कंदाहार भागात हल्ले केले. पाक लष्कराने सांगितले की, आम्ही अफगाण तालिबानच्या हल्ल्यांना त्यांच्या तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले व त्यांचे मुख्य तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये कंदाहार प्रांतातील तालिबानची चौथी बटालियन आणि सहावी बॉर्डर ब्रिगेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
एका आठवड्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हा तिसऱ्यांदा मोठा संघर्ष उफाळला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या जागा ताब्यात घेतल्याचा दावा केला. दरम्यान, अफगाणिस्तान समर्थित ‘वॉर ग्लोब न्यूज’ने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, खैबर पख्तुनख्वाच्या सीमावर्ती भागात तालिबानी ड्रोनने पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला केला.