तेहरान : इराणचे माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून नोंदणी केली.
अहमदीनेजाद हे इराणचे कट्टरपंथी नेते समजले जातात. त्यांनी यापूर्वी २००५ ते २०१३ या कालावधीत दोन वेळा इराणचे अध्यक्षपद भूषवले आहे. इराणच्या कायद्यानुसार चार वर्षे पदापासून दूर राहिल्यानंतर आता ते पुन्हा निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत. त्यानंतर त्यांनी रविवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आणि इराणी झेंडे फडकावले. पद सोडल्यापासून त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची प्रसिद्धी वाढवली आहे आणि जागतिक नेत्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी पत्रे लिहिली आहेत. त्यांनी सरकारी भ्रष्टाचारावरही टीका केली आहे. अहमदीनेजाद हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे विरोधक मानले जातात. यापूर्वी सत्तेत असताना त्यांनी खामेनी यांना विरोध केला होता. खामेनी यांचे विश्वासू असलेले इराणचे अध्यक्ष रईसी यांचे नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते.