
चेन्नई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारताचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला होता. त्यावरून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी परदेशी माध्यमांना आव्हान दिले की, ‘पाकिस्तानने भारताचे नुकसान केल्याचे एक तरी छायाचित्र, व्हिज्युअल दाखवावे’.
‘आयआयटी मद्रास’च्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात अजित डोवाल बोलत होते. त्यांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पुन्हा एकदा सविस्तर माहिती सांगितली. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांना अचूकपणे लक्ष्य केले. या कारवाईसाठी भारताला फक्त २३ मिनिटे लागली, असेही त्यांनी नमूद केले.
अचूक लक्ष्य
आपल्याला स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. ‘सिंदूर’चा उल्लेख करत ते म्हणाले की, या ‘ऑपरेशन’अंतर्गत स्वदेशी सामग्री वापरण्यात आल्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर ९ दहशतवादी तळांना टार्गेट करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही एकही लक्ष्य चुकवले नाही. आम्ही त्याशिवाय इतर कुठेही लक्ष्य केले नाही. आमचे लक्ष्य इतके अचूक होते की आम्हाला माहीत होते की कोण कुठे आहे, संपूर्ण ‘ऑपरेशन’ला २३ मिनिटे लागली.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या लष्करी प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’वरील वृत्तांकनासाठी अजित डोवाल यांनी परदेशी माध्यमांवर टीका केली. तसेच त्यांना भारतातील पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही विध्वंसाचे दृश्य दाखवण्याचे आव्हान त्यांनी दिले. ते म्हणाले की, परदेशी माध्यमांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने हे केले आणि ते केले, पण मी सांगतो की तुम्ही मला एक चित्र दाखवा, ज्यामध्ये कोणत्याही भारतीय गोष्टीचे नुकसान झाले, असे ते म्हणाले.
व्हिज्युअल दाखवावे
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला, मात्र भारताने नागरी वस्तींवर हल्ला केला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकने भारताचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला. मात्र, हा दावा भारताने फेटाळून लावला. या पार्श्वभूमीवर बोलताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विदेशी मीडियाला आव्हान देत पाकिस्तानने भारताचे नुकसान केल्याचे एक व्हिज्युअल दाखवावे, असे म्हटले आहे.