

न्यू यॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची सत्ता उलथवून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे व्हाईट हाऊसचे माजी अधिकारी (राष्ट्रपतींचे उप-सहाय्यक) अलेक्झांडर बटरफिल्ड यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९७३ मध्ये अमेरिकन सिनेटसमोर साक्ष देताना ‘वॉटरगेट हेरगिरी प्रकरणा’चा खुलासा केला आणि व्हाईट हाऊसमध्ये संभाषण रेकॉर्ड करणारी गुप्त टेप प्रणाली अस्तित्वात आहे, असे सांगितले.
वॉटरगेट कॉम्प्लेक्समधील डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीमध्ये हेरगिरी करताना १९७२ मध्ये ५ लोक पकडले गेले. यांचा संबंध निक्सन यांच्या पक्षाशी होता. दबाव वाढल्याने १९७४ मध्ये निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला. असे करणारे ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले.
या घटनेनंतर अमेरिकेच्या राजकारणात वादळ निर्माण झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जेव्हा ही टेप सार्वजनिक झाली, तेव्हा निक्सन उघडे पडले. महाभियोगाची वेळ येण्यापूर्वीच निक्सन यांनी भीतीपोटी राजीनामा दिला. बटरफिल्ड हे निक्सन यांच्या ‘चीफ ऑफ स्टाफ’चे जुने मित्र होते. त्यांनीच व्हाईट हाऊसमध्ये सिक्रेट सर्व्हिससोबत मिळून हे रेकॉर्डिंग सिस्टम बसवले होते.