अमेरिका भारतावरही उगारणार कराचा बडगा? मोदी-ट्रम्प भेटीआधी धमकीने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून त्यांनी अनेक देशांवर कर लावण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिका भारतावरही उगारणार कराचा बडगा? मोदी-ट्रम्प भेटीआधी धमकीने खळबळ
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून त्यांनी अनेक देशांवर कर लावण्यास सुरुवात केली आहे. आता अमेरिकेकडून भारतावरही परस्पर कर लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी ही धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

मोदी-ट्रम्प यांची भारतीय वेळेनुसार शुक्रवारी पहाटे भेट होण्याआधी याबाबतची घोषणा केली जाऊ शकते. परस्पर शुल्क म्हणजे एखादा देश अमेरिकन वस्तूंवर जो काही कर लावेल, तोच कर अमेरिका त्या देशातील वस्तूंवर देखील लावेल. या परस्पर करांचा फटका विद्युत, औद्योगिक यंत्रसामग्री, दागिने, औषधनिर्माण, इंधन, लोखंड आणि पोलाद, कापड, वाहने आणि रसायने उद्योगाला बसणार आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “तीन उत्तम आठवडे, कदाचित आतापर्यंतचे सर्वोत्तम. परंतु आजचा दिवस मोठा आहे: परस्पर कर!!! अमेरिका पुन्हा महान बनवू!!!”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ यांची भेट घेतली. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल हेदेखील उपस्थित होते. तत्पूर्वी, दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी सकाळी अमेरिकन भूमीत स्वागत करण्यात आले. त्यांनी प्रथम अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली.

दरम्यान, फ्रान्सच्या दौऱ्यात त्यांनी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी एआय आणि नागरी अणुऊर्जेवरील सहकार्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

अमेरिका दौऱ्याबाबत मोदी म्हणाले, ते त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यास उत्सुक आहेत. जागतिक भागीदारी निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात एकत्र काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींचे वॉशिंग्टनमध्ये जोरदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौरा आटोपून गुरुवारी अमेरिका दौऱ्यावर पोहोचले. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये पोहोचताच भारतीय समुदायाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मोदी गुरुवारी पहाटे वॉशिंग्टन डीसीमधील जॉइंट बेस अँड्रूज येथे उतरले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच अमेरिका दौरा आहे.

logo
marathi.freepressjournal.in