जेरुसलेम : इस्रायलच्या भूदलाने शुक्रवारी रात्रीपासून गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात आक्रमणाची व्याप्ती वाढवली आहे. इस्रायली रणगाडे, चिलखती वाहने आणि भूदल या भागात घुसले असून ही भविष्यातील मोठ्या आक्रमणाची तयारी मानली जात आहे.
इस्रायलने गाझातील दूरसंदेश यंत्रणा आणि इंटरनेट सेवा तोडली आहे. इस्रायलच्या हवाईदलाने गाझावरील बॉम्बहल्ले सुरूच ठेवले आहेत. गेल्या दिवसभरात इस्रायलने गाझा पट्टीच्या उत्तरेकडील प्रदेशात हमासच्या १५० हून अधिक भूमिगत लक्ष्यांवर मारा केला आहे. हमासनेही इस्रायलच्या सैन्याला पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, इस्रायलने गाजा पट्टीत शनिवारी काही प्रमाणात मानवतावादी मदत सामग्री पाठवण्यास परवानगी दिली. इजिप्तच्या सीमेवरील राफा क्रॉसिंगवरून मदत सामग्री घेऊन आणखी काही ट्रक्स गाझात दाखल झाले.
हमासचा नाविक कमांडर ठार
इस्रायलच्या सेनादलांनी शुक्रवारी रात्री गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या नाविक दलाचा कमांडर रातेब अबू साहिबान मारला गेला आहे. साहिबान यानेच इस्रायलच्या किनाऱ्यावरील झिकिम येथे २४ ऑक्टोबरच्या रात्री हमासच्या पाणबुड्यांसह हल्ला करण्याचा बेत आखला होता. हमासचा हा प्रयत्न इस्रायलच्या नौदलाने हाणून पाडला होता.