वॉशिंग्टन : जगात सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता वाढत आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जाणार आहे. अनेक कंपन्यांनी त्याचा वापर सुरू केला आहे. आता जगातील नामवंत तंत्रज्ञान कंपनी ' अॅपल'ने आयफोन व आयवॉचच्या सहाय्याने स्त्री गर्भवती आहे का? हे सांगणारे तंत्रज्ञान विकसित केले.
' अॅपल' ने कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली. यात आयफोन व आयवॉचद्वारे मिळणाऱ्या माहितीवरून ९२ टक्के अचूकपणे स्त्रीच्या गर्भारपणाची माहिती मिळणार आहे. या तंत्रज्ञानाचे नाव 'बियाँड सेन्सर डेटा : फाऊंडेशन मॉडेल्स ऑफ बिहेवियरल डेटा फ्रॉम वेरेबल इम्प्रुव्ह हेल्थ प्रेडिक्शन' आहे. ही नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता, काही खास आरोग्यविषयक संकेतावरून जसे, झोपेची गुणवत्ता, हृदयाचे ठोके, चालणे आणि महत्त्वाच्या बाबी ओळखू शकते. कंपनीने विकसित केलेल्या मॉडेलनुसार, गर्भारपणाच्या काळात आरोग्यात होणारे बदलही टिपत असते. हे नवीन मॉडेल विकसित करायला २.५ अब्ज तासांचा डेटाचा वापर केला. मात्र हे तंत्रज्ञान कधी वापरात येणार हे कंपनीने अजूनही जाहीर केले नाही.
४३० गर्भवतींचा डेटा वापरला
संशोधकांनी ४३० गर्भवतींचा डेटा वापरून गर्भवती डेटासेट बनवला. या महिलांची प्रसूती साधारण किंवा सिझेरियन पद्धतीने झाली होती. अॅपल हेल्थ अॅप, हेल्थ किट व हृदयाचे ठोके आदींची माहिती गोळा केली. मुलांच्या जन्माच्या आधी नऊ महिने व प्रसूतीनंतर एक महिना 'पॉझिटिव्ह' होते. कारण प्रसूतीनंतर महिलांमध्ये व्यापक शारीरिक बदल होत होते. तसेच संशोधकांनी ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व गर्भवती नसलेल्या २४ हजारांहून अधिक महिलांची माहिती गोळा केली. त्यातून संशोधकांनी अधिक अचूक निष्कर्ष येण्यासाठी अभ्यास केला.