शेजारी देशांकडून कौतुक; नेपाळ, मॉरिशस, भूतानच्या नेत्यांचे संदेश

शेजारच्या नेपाळ, मॉरिशस आणि भूतानच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केले.
शेजारी देशांकडून कौतुक; नेपाळ, मॉरिशस, भूतानच्या नेत्यांचे संदेश

नवी दिल्ली : भारतात यशस्वीपणे पार पडलेल्या जगातील सर्वांत मोठ्या निवडणूक प्रक्रियेबद्दल अनेक देशांनी भारताचे कौतुक केले आहे. तसेच विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

शेजारच्या नेपाळ, मॉरिशस आणि भूतानच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केले. “पंतप्रधान मोदीजी, ऐतिहासिक तिसऱ्या टर्मसाठी तुमच्या प्रशंसनीय विजयाबद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी लोकशाही उल्लेखनीय प्रगती करत राहील. मॉरिशस-भारत विशेष संबंध चिरंतन राहो,” असे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदींचे अभिनंदन केले आहे. “लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएला सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. भारतातील लोकांच्या उत्साही सहभागाने जगातील सर्वात मोठी निवडणूक यशस्वीपणे पूर्ण झाल्याची नोंद घेताना आम्हाला आनंद होत आहे,” असे दहल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे म्हणाले की, ते भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहेत. “जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत सलग तिसरा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि एनडीएचे अभिनंदन. ते भारताला मोठ्या उंचीवर नेत असताना, मी आपल्या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे,” असे तोबगे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in