
गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये परत न केल्याप्रकरणी सहारा इंडियाचे मालक सुब्रत रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पाटणा हायकोर्टाने बिहार, दिल्ली व उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना (डीजीपी) सुब्रत रॉय यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाने एक दिवसापूर्वीच सहाराश्रींना कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले होते. पण, ते हजर झाले नाहीत.
सहाराच्या वकिलांनी हायकोर्टापुढे सुब्रत रॉय यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला. त्यावर न्यायमूर्ती संदीप कुमार यांनी रॉय कोर्टात हजर राहू शकत नाहीत, असा कोणताही आजार त्यांना नाही, असे ठणकावून सांगितले.
गुंतवणूकदारांनी हायकोर्टात पैसे परत करण्यासंबंधी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सुब्रत रॉय यांना १२ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, रॉय यांनी अंतरिम अर्ज सादर करुन याबाबत सूट मागितली होती. कोर्टाने ती फेटाळून लावली. सहारा इंडियाच्या मालकांना कोणत्याही स्थितीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता हजर रहावे लागेल. ते आले नाही, तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल, असा इशारा कोर्टाने याप्रकरणी दिला होता.