पॅरिस : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनाला काही तास शिल्लक असताना शुक्रवारी जाळपोळ आणि तोडफोडीने फ्रान्स हादरले. हल्लेखोरांनी फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वेला लक्ष्य केले. त्यामुळे फ्रान्स आणि युरोपच्या उर्वरित भागातून पॅरिसला जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली.
पॅरिसमधील सीन नदीवर शुक्रवारी रात्री ऑलिम्पिकचा नेत्रदीपक सोहळा रंगण्यापूर्वीच हा हल्ला झाल्याने पॅरिस ऑलिम्पिकवर दहशतीचे सावट पसरले आहे. ऑलिम्पिकसाठी पॅरिस शहर सज्ज झाले असतानाच या जाळपोळ व तोडफोडीमुळे शहराला आता लष्करी छावणीचे रुप प्राप्त झाले आहे.
ऑलिम्पिकच्या अनोख्या सोहळ्याला काही तास शिल्लक असतानाच फ्रान्समधील वाहतूक प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कला हल्लेखोरांनी टार्गेट केले. अटलांटिक, नॉर्ड आणि एस्टच्या हाय-स्पीड लाईन्सवरील ट्रॅकजवळ तीन ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली. लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसला.
बॉम्ब अलर्टने विमानसेवेला फटका
तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांनंतर बॉम्बचा अलर्ट आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव स्वित्झर्लंड आणि फ्रान्स सीमेवरील बेसल-मुलहाऊस हे विमानतळ रिकामे करण्यात आले. त्याचा फटका विमानसेवेला बसला.
सुरक्षेच्या कारणामुळे हे टर्मिनल रिकामे करावे लागत आहे. त्यामुळे सध्या सेवा बंद करण्यात आल्याचे, बेसल-मुलहाऊसने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. दरम्यान बॉम्बचा अलर्ट आल्याने एअर फ्रान्सची विमान सेवा मुलहाऊस एअरपोर्टवर ‘स्टॅंडबाय’वर ठेवण्यात आली होती. काही तासांनंतर सुरक्षेबाबतची तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमानतळावरील सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
फ्रेंच पंतप्रधानांनी केला हल्ल्याचा निषेध
या हल्ल्यानंतर फ्रान्सची सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली आहे. फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. "तोडफोडीचे कृत्य" असे या घटनेचे वर्णन त्यांनी केले. गुन्हेगारांना शोधण्यासाठी फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणा सज्ज झाल्याचे अट्टल म्हणाले. या घटनांमुळे पॅरिसला उर्वरित फ्रान्स आणि शेजारील देशांशी जोडणाऱ्या अनेक हायस्पीड सेवा ठप्प झाल्या, असे फ्रान्सचे वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हेरग्रीएट यांनी सांगितले. फ्रान्सची सरकारी रेल्वे कंपनी ‘एसएनसीएफ’ने दिलेल्या माहितीनुसार, हायस्पीड रेल्वे लाइन नेटवर्क बंद करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसच्या उत्तर लिली, पश्चिमच्या बोर्डो आणि पूर्वच्या स्ट्रासबर्गसारख्या शहरांना जोडणाऱ्या मार्गांना टार्गेट केले आहे. यामुळे अनेक रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.