अंतराळवीर सुनीता विल्यम्स चालणेही विसरली; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सात महिने अडकल्याचा परिणाम

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या गेल्या सात महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत.
सुनीता विल्यम्स
सुनीता विल्यम्स
Published on

केप केनेडी : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या गेल्या सात महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. त्या केवळ ८ दिवसांसाठी अंतराळात गेल्या होत्या. पण, तांत्रिक अडचणी वाढत गेल्या आणि त्यांचा अंतराळातील मुक्कामही वाढत गेला. आता अंतराळ स्थानकात राहून मी चालणे व बसणेही विसरले आहे, असे सुनीता विल्यम्स यांनी सांगितले.

सुनीता विल्यम्स या अंतराळवीर बूच विल्मोर यांच्यासोबत आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या होत्या. तांत्रिक समस्यांमुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबणीवर पडत गेले.

बोईंगच्या ‘स्टारलायनर कॅप्सुल’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना अंतराळात थांबावे लागले आहे. कारण त्यांना न घेताच कॅप्सूल पृथ्वीवर आले. नासा व एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेसएक्स’ही दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, अजूनही त्यांना यश आलेले नाही. या सात महिन्यांच्या काळात किती अडचणींना तोंड द्यावे लागले, याबाबत सुनीताने सांगितले की, मी अनेक महिन्यांपासून चालू किंवा बसू शकले नाही. आता चालतात कसे हेही मी विसरून गेले आहे. नीडहॅम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना सुनीता म्हणाली की, मी प्रदीर्घ काळापासून येथे आहे. चालतात कसे याचा अनुभव घेणे मला कठीण बनले आहे. मी अनेक महिने चालले किंवा बसले नाही. कारण येथे असे करण्याची गरज लागत नाही. येथे तुम्ही केवळ डोळे बंद करू शकता व जेथे आहात तेथे पोहू शकता, असा अनुभव त्यांनी सांगितला.

प्रदीर्घ काळ राहणे बनले कठीण

माझा अंतराळ प्रवास अपेक्षेपेक्षा अधिक झाला आहे. मला जास्तीत जास्त एक महिना राहावे लागेल, असे वाटत होते. पण, इतका प्रदीर्घ काळ राहावे लागणे हे आश्चर्यकारक आहे, असे त्यांनी सांगितले.

सणही आंतरराष्ट्रीय स्थानकात साजरे केले

सुनीता व विलमोर यांनी थँक्सगिव्हींग, नाताळ आदी सण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात साजरे केले. जानेवारीत सुनीताने पहिल्यांदा स्पेसवॉक केला. तसेच राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी अंतराळातून पहिल्यांदाच मतदान केले. अंतराळात इतके वर्षे राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यांची छायाचित्रे पाहताना त्यांचे वजन खूपच कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.

सुनीता विल्यम्सना पृथ्वीवर आणणार - ट्रम्प

गेले सात महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टेस्लाचे सीईओ ॲॅलन मस्क यांच्यावर सोपवली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी विल्यम्स यांना अंतराळात सोडून दिले, असा आरोप ट्रम्प यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in