
फ्लोरिडा : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर हे दोघेही भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.२७ वाजता पृथ्वीवर दाखल झाले आणि सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनीता आणि त्यांचा सहकारी बुच हे तांत्रिक बिघाडामुळे तब्बल नऊ महिने अंतराळातच अडकून पडले होते. सुनीता आणि बुच यांना घेऊन ‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’चे कॅप्सूल भारतीय वेळेनुसार पहाटे पृथ्वीवर दाखल झाले.
सुनीता आणि बुच हे दोघे अंतराळवीर ५ जून २०२४ रोजी ‘स्टारलाइनर’मधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते. तेथे आठ दिवस घालविल्यानंतर ते परतणार होते. मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला आणि हे दोघे तेथेच अडकून पडल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर बुधवारी पहाटे सर्व अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले.
‘बोईंग स्टारलायनर’वरून ५ जून २०२४ रोजी अंतराळात गेलेल्या या दोघांनी ‘स्पेसएक्स’च्या ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’मधून पृथ्वीवर पुनरागमन केले. त्यांच्यासोबत ‘नासा’चे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गॉर्बुनोव्ह हेदेखील होते. अंतराळयानाने परतीच्या प्रवासादरम्यान पॅराशूटद्वारे फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग केले. ‘नासा’च्या पथकाने यानाचे हॅच उघडले आणि अंतराळवीरांना बाहेर येण्यासाठी मदत केली. सुनीता विल्यम्स यांनी यानातून बाहेर आल्यानंतर हात उंचावून आनंद व्यक्त केला. या ऐतिहासिक मोहिमेचे सर्व जगातून कौतुक होत आहे.
या अंतराळवीरांना बोईंगचे ‘स्टारलायनर’ अंतराळयान पृथ्वीवर परत आणणार होते. पण त्यात बिघाड झाला. यामुळे त्यांना पृथ्वीवर परत आणण्यास दीर्घकाळ वाट पाहावी लागली. त्यांना घेऊन अखेर एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचे ‘ड्रॅगन कॅप्सूल’ फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी १७ तासांचा वेळ लागला. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता चार अंतराळवीरांना घेऊन आलेले कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रावर अलगदपणे उतरले.
समुद्राच्या पृष्ठभागावर ते उतरल्यानंतर नियंत्रण कक्षाने अंतराळवीरांचे स्वागत केले. ‘निक, एलेक, बुच, सुनी... स्पेसएक्समधून घरी परत आल्याबद्दल तुमचे स्वागत आहे’, अशा शब्दांत त्यांचे स्वागत करण्यात आले.
डॉल्फिननीही केले स्वागत
ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्याचा वेग ताशी १७,००० मैल होता. तो काही मिनिटांतच कमी झाला. पहाटे ३:२४ वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा ड्रॅगन कॅप्सूलचे दोन पॅराशूट उघडले गेले. यामुळे त्याचा वेग आणखी कमी झाला. या दरम्यान, एक धक्का बसल्यानंतर कॅप्सूलचा वेग आणखी मंदावला आणि ते अलगदपणे समुद्रात उतरले. त्यानंतर रिकव्हरी टीमने तेथे पोहोचून पहिल्यांदा सुरक्षेची तपासणी केली आणि पॅराशूट हटवले. दरम्यान, समुद्राच्या पाण्यावर कॅप्सूल उतरल्यानंतर त्याच्याभोवती डॉल्फिन गोळा झालेले दिसले. ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरने या क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर रिकव्हरी टीमने ‘कॅप्सूल’ बोटीवर चढवले. यानंतर जगभरातील लोकांनी सुनिता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर येताना पाहिले.