सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील बॉन्डी बीचवर बंदुकधारी व्यक्तींनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन हल्लेखोरांपैकी एकाचा गोळीबारातच मृत्यू झाला असून दुसऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. एका रेस्टॉरंटमध्ये लपून आपला जीव वाचवल्याची माहिती त्यानेच दिली.
सिडनीच्या बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान अचानक दोन व्यक्तींनी ज्यू समुदायातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली होती. या गोळीबाराच्या घटनेनंतर सिडनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एक निवेदन जारी करत घटनेची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.
सिडनी शहरातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा मानल्या जाणाऱ्या बॉन्डी बीचवर ज्यू धर्मातील अतिशय पवित्र समजला जाणारा हनुका उत्सव साजरा करण्यासाठी ज्यू धर्माचे लोक एकत्र जमले होते. त्याठिकाणी आलेल्या दोन बंदूकधारी व्यक्तींनी उपस्थित लोकांवर अचानक गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे, तर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसऱ्याची प्रकृती गंभीर असून त्याची चौकशी सुरू आहे. गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांपैकी एकाची ओळख नवीद अक्रम अशी झाली आहे. पोलिसांनी त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केला आहे. घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
न्यू साऊथ वेल्स रुग्णवाहिकेने रात्री दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६ रुग्णांना सिडनीतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अनेकांवर उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर मेलबर्नमधील हनुक्का महोत्सव रद्द करण्यात आला आहे. या हल्ल्यात तिसरा संशयित सहभागी होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.