
व्हिएन्ना : ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याने त्यानंतर शौचालयात जाऊन स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.
एक विद्यार्थी बंदूक घेऊन थेट शाळेत पोहोचला होता आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर विद्यार्थ्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना सकाळी १० वाजता माहिती मिळताच त्यांनी लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून माहिती दिली की, शाळा रिकामी करण्यात आली आहे आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता कोणताही धोका नाही. ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहराची लोकसंख्या सुमारे ३,००,००० आहे. गोळीबारात काही लोक जखमी देखील झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्राझ शहराचे महापौर एल्के काहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी आहेत. शाळेतील गोळीबाराची चौकशी करण्याची जबाबदारी ‘स्पेशल टास्क फोर्स’कडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहराकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.