बीजिंग : माऊंट एव्हरेस्ट पर्वताच्या उतारांवर आलेल्या बर्फाच्या वादळात एक गिर्यारोहक ठार झाला असून १३७ जणांना वाचवण्यात यश आले आहे, असे स्थानिक चिनी अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. शेकडो गिर्यारोहक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
‘जिन्हुआ’ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पुरुष गिर्यारोहकाचा मृत्यू तीव्र उंचीजन्य आजारामुळे झाला. किंगहाई प्रांतात सुरू असलेल्या सततच्या हिमवर्षावामुळे अडकलेल्या १३७ गिर्यारोहकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आठ दिवसांच्या राष्ट्रीय सुट्ट्यांदरम्यान १०० हून अधिक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट परिसरात गेले. अत्यंत उंचीवरील आणि गुंतागुंतीच्या भौगोलिक रचनेच्या या पर्वतरांगांमध्ये सुट्टीदरम्यान सतत हिमवर्षाव होत राहिला.
बचाव पथके, घोडे आणि दोन मध्यम आकाराचे ड्रोन यांच्या मदतीने अडकलेल्या गिर्यारोहकांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे. राज्य नियंत्रित सीसीटीव्हीने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, ३५० जणांना वाचवण्यात आले असून २०० जण अद्याप बेपत्ता आहेत.
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टच्या चिनी बाजूवरील कर्मा व्हॅली भागात १ हजाराहून अधिक गिर्यारोहक अडकले होते. दक्षिण चीनमधील शेंझेन शहरातील एका महिलेला तिच्या पतीचा सॅटेलाइट फोनवरून मदतीसाठी कॉल आला. तो आणि त्याचा गट कर्मा व्हॅलीतील ओगा कॅम्पसाइटवर जड बर्फात अडकले होते.
त्या महिलेने सांगितले की, तिने त्वरित स्थानिक पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी सांगितले की, काही गिर्यारोहकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि बचाव पथके पाठवली जात आहेत. पण बचावकर्त्यांसाठीही हे सोपे नाही. त्यांना मार्ग मोकळा करण्यासाठी बर्फ साफ करावा लागत आहे. स्थानिक गावकरी आणि मार्गदर्शक मदतीसाठी पुढे आले आहेत.