बलुचिस्तान ट्रेन अपहरण : २८ पाक सैनिक, ३० अतिरेकी ठार; चकमकीत काही ओलिसांचाही मृत्यू, ३४६ ओलिसांची सुटका करण्यात यश

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘जाफर एक्स्प्रेस’ ही रेल्वेगाडी बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) हायजॅक केल्यानंतर पाक लष्कराने बुधवारी केलेल्या कारवाईत सर्व ३० अतिरेकी मारले गेले असून, २८ पाक सैनिक ठार झाले आहेत.
बलुचिस्तान ट्रेन अपहरण : २८ पाक सैनिक, ३० अतिरेकी ठार; चकमकीत काही ओलिसांचाही मृत्यू, ३४६ ओलिसांची सुटका करण्यात यश
Published on

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘जाफर एक्स्प्रेस’ ही रेल्वेगाडी बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) हायजॅक केल्यानंतर पाक लष्कराने बुधवारी केलेल्या कारवाईत सर्व ३० अतिरेकी मारले गेले असून, २८ पाक सैनिक ठार झाले आहेत. चकमकीत काही ओलिसांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाक सरकारने लष्करी कारवाईअंती ३४६ ओलिसांची सुखरूप सुटका केल्याचे सांगितले.

मंगळवारी ही ट्रेन हायजॅक करण्यात आल्यानंतर ओलिसांच्या सुटकेसाठी पाकिस्तान लष्कर व पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते. बुधवारी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईत ‘बलूच लिबरेशन आर्मी’च्या सर्व ३० अतिरेक्यांना ठार केले व ३४६ ओलिसांची सुटका केली. मात्र, ‘बीएलए’ने पाकिस्तानी सैनिक आणि ओलीस असे मिळून १०० पेक्षा जास्त जणांना ठार केल्याचा दावा केला आहे.

१५० ओलीस ताब्यात?

‘बीएलए’ने बुधवारी रात्री ८ वाजता निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, गेल्या एक तासात त्यांनी ५० पेक्षा जास्त ओलिसांचा खात्मा केला आहे. त्यांच्या ताब्यात अजूनही १५० ओलिस आहेत. जर पाकिस्तान सरकारने पुढील २० तासांत बलुच कैद्यांना सोडले नाही तर या सर्व लोकांनाही मारले जाईल, असे ‘बीएलए’ने म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तान सरकारने बुधवारी दुपारी २०० शवपेट्या क्वेटा येथे पाठवल्या आहेत. बचाव कार्य सुरू असून हवाई दल आणि लष्कराच्या जवानांनी बलुच सैनिकांना वेढा घातला. बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेले आत्मघातकीजॅकेट घातले असल्याने ओलिसांना सोडवण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात येते. ‘बीएलए’ने ओलिसांना सोडण्यासाठी तुरुंगात असलेले बलुच कार्यकर्ते, राजकीय कैदी, बेपत्ता व्यक्ती, अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in