Bangladesh Crisis : बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा

सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आंदोलकांनी शनिवारी सकाळपासून सुप्रीम कोर्टाला घेराव घातला होता.
Bangladesh Chief Justice Obaidul Hassan
बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामाCanva
Published on

ढाका : बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्टला राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे.

सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आंदोलकांनी शनिवारी सकाळपासून सुप्रीम कोर्टाला घेराव घातला होता. विद्यार्थ्यांनी सांगितले की, न्यायाधीशांनी राजीनामा न दिल्यास हसीना यांच्याप्रमाणे त्यांना खुर्चीवरून खेचून उतरवले जाईल. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संगनमत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.

हंगामी सरकारला विचारल्याशिवाय न्यायाधीशांनी शनिवारी कोर्टात बैठक बोलावली होती. यावेळी आंदोलकांनी एका तासाच्या आत न्यायाधीशांना राजीनामा देण्यास सांगितले. सरन्यायाधीशांनी राजीनामा दिल्यानंतर आता अन्य न्यायाधीश आपले पद सोडू शकतात.

बांगलादेशात हसीना यांच्या राजीनाम्यानंतर हिंसाचार वाढला असून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. दिनाजपूर येथे चार हिंदू गावांना आगी लावल्या आहेत. अनेक हिंदूंचे संसार रस्त्यावर आले आहेत. लपूनछपून त्यांना जगावे लागत आहे, असे ढाक्यातील हिंदू आंदोलकांनी सांगितले.

अल्पसंख्यांक मंत्रालयाची स्थापना, अल्पसंख्यांक संरक्षण आयोगाची स्थापना, अल्पसंख्यांकांविरोधात हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्याची मागणी हिंदू समाजाने केली आहे. तसेच हिंसाचारात नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई द्यावी. हिंदूंची तोडलेली मंदिरे पुन्हा बांधून द्यावीत आदी मागणीही केली.

बांगलादेशातील हिंसाचारानंतर हजारो बांगलादेशी हिंदू भारतात येण्यासाठी सीमेवर पोहचले आहेत. हिंदूंवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात शेख हसीना यांच्या अवामी लीगने चिंता व्यक्त केली आहे.

आम्हाला ठार करा, पण बांगलादेश सोडणार नाही :

आम्ही बांगलादेशात जन्माला आलो आहोत. आमच्या पूर्वजांची हीच जमीन आहे. या देशावर आमचाही तेवढाच हक्क आहे. आम्हाला ठार करा, पण आमचे जन्मस्थळ बांगलादेश सोडणार नाही. आमचा अधिकार मिळवायला रस्त्यावर राहून आंदोलन करू, असा इशारा बांगलादेशातील हिंदू आंदोलकांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in