

ढाका : बांगलादेशात हिंदू कुटुंबांच्या किमान पाच घरांना आग लावण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना शनिवार, २७ डिसेंबर रोजी पिरोजपूर जिल्ह्यातील दम्रिताला गावात घडल्याचे सांगितले जात आहे.
पीडित कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा ते घरामध्ये अडकले होते, कारण दरवाजे बाहेरून बंद होते. एकूण आठ लोक पत्र्याचे आणि बांबूचे कुंपण तोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पण त्यांची घरे, सामान आणि पाळीव प्राणी पूर्णपणे जळून खाक झाले.
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. हल्लेखोरांनी एका खोलीत कपडे भरून आग लावली, ज्यामुळे आग वेगाने संपूर्ण घरात पसरली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ज्यात लोक आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.