

ढाका : बांगलादेशात मागील चोवीस तासांत दोन हिंदू नागरिकांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मागील १८ दिवसांतील ही सहावी हत्या असून बांगलादेशात हिंदू नागरिकांच्या हत्यांचे सत्र सुरूच आहे. मणी चक्रवर्ती असे हत्या झालेल्या हिंदू नागरिकाचे नाव असून तो नरसिंगडी जिल्ह्यातील चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवत होता.
काही अज्ञात व्यक्तींनी दुकानात बसलेल्या मणी चक्रवर्तीवर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने भर बाजारात हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मणीचा मृत्यू झाला. या घटनेने बाजारात दैनंदिन व्यापार करणाऱ्या अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मणीचा स्वभाव शांत होता. तसेच तो एक प्रतिष्ठित व्यापारी होता. त्याचे कोणाबरोबर वादही नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. मणी चक्रवर्तीची हत्या करणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. वारंवार होत असलेल्या हल्ल्याने हिंदू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे बाजारातील काही व्यापारांनी सांगितले.