ढाका : बांगलादेशमध्ये हिंदू व्यापारी खोकन दास यांच्यावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी करण्यात आला होता त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. शनिवारी ढाका येथील नॅशनल बर्न इन्स्टिट्युटमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
नॅशनल बर्न इन्स्टिट्युटचे प्राध्यापक डॉ. शाओन बिन रहमान यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. खोकन दास (५०) यांना १ जानेवारी रोजी रस्त्यावर ढकलून मारहाण करण्यात आली होती. पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि नंतर त्यांना जाळून टाकण्यात आले. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळच्या तलावात उडी मारली.
दास यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी घटनास्थळी धावले आणि हल्लेखोरांना पळून जाण्यास भाग पाडले. नंतर स्थानिकांनी दास यांना वाचवले आणि शरीयतपूर येथील रुग्णालयात दाखल केले. दास हे कोनेश्वर युनिअनमधील तिलोई गावचे रहिवासी होते. केउरभंगा बाजारात त्यांचा मोबाईल बँकिंगचा व्यवसाय होता. तसेच, ते फार्मसीही चालवत असत. बुधवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर ते ऑटोरिक्षाने घरी परतत असताना बाजाराजवळील दामुड्या शरियतपूर रस्त्यावर हल्लेखोरांनी गाडी थांबवली आणि त्यांच्यावर हल्ला केला होता.
बांगलादेशात आणखी एका हिंदूला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंताजनक
दरम्यान, बांगलादेशात गाजीपूरमधील टोंगी भागात एका हिंदू भिकाऱ्याला जमावाने खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. टोंगी येथे शुक्रवारी चोरीच्या संशयावरून जमावाने सुमन नावाच्या एका व्यक्तीला पकडले. जमावाने त्याला केवळ पकडलेच नाही, तर एका खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन हा रस्त्यावर भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत हात. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. जमावाच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. केवळ सुमन या नावावरून तो हिंदू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.