धुमसता बांगलादेश! संसद बरखास्त, शेख हसीना यांना अमेरिकेचा झटका; ब्रिटनकडून संदिग्धता, भारताची सावध भूमिका

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या पलायनानंतर झालेल्या हिंसाचारात शंभरहून अधिक जण ठार झाले असून, आतापर्यंत या हिंसाचारात बळी पडलेल्यांची संख्या ४४० झाली आहे.
धुमसता बांगलादेश! संसद बरखास्त, शेख हसीना यांना अमेरिकेचा झटका; ब्रिटनकडून संदिग्धता, भारताची सावध भूमिका
AFP
Published on

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही अद्याप बांगलादेश धुमसत आहे. शेख हसीना यांच्या पलायनानंतर झालेल्या हिंसाचारात शंभरहून अधिक जण ठार झाले असून, आतापर्यंत या हिंसाचारात बळी पडलेल्यांची संख्या ४४० झाली आहे. बांगलादेशच्या अध्यक्षांनी संसद बरखास्त केली असून नोबेल पुरस्कारविजेते मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे प्रमुख असतील, असे सध्याचे चित्र आहे. माजी पंतप्रधान खलिदा झिया यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. बांगलादेशात सध्या अस्थिर वातावरण असून, भारताने त्यामुळे सावध भूमिका घेतली आहे. शेख हसीना यांना भारताने त्या अंतिम निर्णय घेईपर्यंत भारतात वास्तव्याची मुभा दिली आहे. तसेच बांगलादेशला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर ब्रिटनने शेख हसीना यांना आश्रय देण्याबाबत संदिग्ध भूमिका घेतली आहे. दरम्यान, बांगलादेशातून पलायन केल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना अमेरिकेनेही मोठा झटका दिला असून त्यांचा व्हिसा अमेरिकेने रद्द केला आहे.

बांगलादेशातील सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यापासून आतापर्यंत तेथे ४४० जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात आणखी १०० जण ठार झाले आहेत. देशातील हिंसाचारग्रस्त स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी लष्कर निकराचे प्रयत्न करीत आहे. बांगलादेशातील स्थितीत मंगळवारी थोडी सुधारणा होत असल्याचे दिसून आले असून, पोलीस आणि लष्कराने गस्त हिंसाचारग्रस्त भागात गस्त घातली. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळाही सुरू झाल्या आहेत. ढाका येथील स्थिती मंगळवारी थोडी शांत होती. बसगाड्या आणि अन्य सार्वजनिक परिवहन वाहने त्याचप्रमाणे सरकारी वाहने आणि बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा रस्त्यावर धावत होत्या. व्यापाऱ्यांनी दुकानेही उघडली होती, असे वृत्त एका पोर्टलने दिले आहे.

हसीना यांना आश्रय देण्याबाबत ब्रिटनकडून संदिग्धता

बांगलादेशात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या हिंसक घटनांचा संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली तपास करावा, असे ब्रिटन सरकारने म्हटले आहे. तथापि, हसीना ब्रिटनमध्ये आश्रय घेणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी ब्रिटनने त्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेश स्थितीबाबत दिली माहिती

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचाराचा उद्रेक झाल्यानंतर देशातून परागंदा झालेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन भारताने दिले आहे. त्याचप्रमाणे भविष्यातील वाटचाल निश्चित करण्यासाठी त्यांना मुदतही देण्यात आली आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले.

संसदेत राजकीय पक्षांच्या नेत्यांना जयशंकर यांनी बांगलादेशातील स्थितीबाबतची माहिती दिली. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांशी संपर्क साधण्यात आला असून तेथे वास्तव्याला असलेल्या १० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे, असेही जयशंकर म्हणाले.

बांगलादेशातील अराजकामागे परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यता जयशंकर यांनी फेटाळली नाही, मात्र स्थिती अस्थिर आहे, असे ते म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. सरकार बांगलादेशातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले.

राजकीय पक्षांकडून सहकार्याचे आश्वासन

बांगलादेशातील संघर्षाला परकीय शक्ती खतपाणी घालत आहे का, असा प्रश्न यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अल्पसंख्यांक समाजाची घरे आणि मालमत्ता यांना आंदोलकांनी लक्ष्य केले आहे, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. हसीना भारतात आल्याला अद्याप २४ तासही झालेले नाहीत, त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यापूर्वी त्यांना भारताने सावरण्यासाठी मुदत दिली आहे, असेही ते म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी सरकारला या प्रश्नावर पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोहम्मद युनूस अंतरिम प्रमुख?

बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असून त्याचे प्रमुखपद स्वीकारण्याची तयारी नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांनी दर्शवली आहे. बांगलादेशातील आरक्षणविरोधी विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी युनूस हे अंतरिम सरकारचे प्रमुख असावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. बांगलादेशला वाचविण्यासाठी युनूस यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली असल्याचे विद्यार्थी नेत्यांनी म्हटले आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन परागंदा व्हावे लागले. समाजमाध्यमावर मंगळवारी सकाळी एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये विद्यार्थी आंदोलनातील एक नेता, मुख्य समन्वयक नाहीद इस्लाम याने आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉ. मोहम्मद युनूस यांच्याशी चर्चा झाल्याचे आणि त्यांनी बांगलादेशला वाचविण्यासाठी अंतरिम सरकारचे प्रमुखपद स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

खलिदा झिया यांची नजरकैदेतून सुटका

बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्याचे आम्ही ठरविले असून त्याचे प्रमुख सल्लागार डॉ. युनूस असतील, असे नाहीद इस्लाम यांनी अन्य दोघा समन्वयकांसमवेत स्पष्ट केले. अंतरिम सरकारमधील अन्य सदस्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असेही इस्लाम यांनी सांगितले. बांगलादेश पार्लमेंट बरखास्त केल्यानंतर अंतरिम सरकार लवकरच स्थापन केले जाईल, असे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी जाहीर केल्यानंतर इस्लाम यांनी ही घोषणा केली. शहाबुद्दीन यांनी सोमवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश दिले. झिया यांना अनेक गुन्ह्यांत दोषी ठरविण्यात आल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

बांगलादेशचे दुसरे स्वातंत्र्य -डॉ. युनूस

डॉ. युनूस हे सध्या देशाबाहेर असून त्यांनी हसीना राजवट संपुष्टात आल्याचे स्वागत केले आहे. बांगलादेशातील घडामोडी म्हणजे देशाचे दुसरे स्वातंत्र्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘त्यांनी’च शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडले - तस्लिमा नसरीन

दरम्यान, आपल्याला ज्या इस्लामवाद्यांनी देशाबाहेर हाकलून दिले, त्याच इस्लामवाद्यांनी शेख हसीना यांना देशाबाहेर परागंदा होण्यास भाग पाडले आहे, असे ‘लज्जा’ या पुस्तकाच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी म्हटले आहे. ‘लज्जा’ या पुस्तकावरून जोरदार निदर्शने झाल्यानंतर १९९० च्या दशकात नसरीन यांना देशातून हद्दपार करण्यात आले होते. ज्या इस्लामवाद्यांचे लांगूलचालन करण्यासाठी शेख हसीना यांनी आपल्याला १९९९ मध्ये देशाबाहेर हाकलून दिले, आपल्याला आजारी आईची भेटही घेऊ दिली नाही, बांगलादेशात पुन्हा कधीही प्रवेश दिला नाही, त्याच शेख हसीना यांना याच इस्लामवादी विद्यार्थी चळवळीद्वारे आता देशाबाहेर परागंदा होण्यास भाग पाडले आहे, असेही नसरीन यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

भारतातील सत्ताधाऱ्यांनी धडा घ्यावा - संजय राऊत

जेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि सत्तेत बसलेले जेव्हा लोकशाहीचा बुरखा घालून हुकूमशहा होतात, तेव्हा जनता ही हुकूमशाही अल्पावधीसाठीच सहन करते आणि त्यानंतर अराजक माजते, असे शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले. बांगलादेशातील घडामोडींवरून भारतातील सत्ताधाऱ्यांनी धडा घ्यावा, असा टोलाही राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.

बांगलादेशमधील परिस्थितीवर भारताचे बारीक लक्ष - जयशंकर

बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीवर भारताचे बारकाईने लक्ष असून, राजनैतिक मार्गाने भारत सातत्याने तेथील भारतीय समुदायाशी संपर्क ठेवून आहे, असे सरकारच्या वतीने मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेत यासंदर्भात निवेदन केले. शेजारील देशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आल्याचे जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत भारतासाठी स्वाभाविकच ती चिंतेची बाब राहणार आहे. त्यामुळे सीमेचे रक्षण करणाऱ्या दलांना अत्यंत सावध राहण्याचे सूचनावजा आदेश देण्यात आले आहेत, असे जयशंकर म्हणाले.

हॉटेल लावलेल्या आगीत २४ ठार

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन देशातून परागंदा झाल्यानंतर अवामी लीगच्या नेत्याच्या मालकीच्या एका तारांकित हॉटेलला आग लावण्यात आली. त्यामध्ये इंडनेशियातील एका नागरिकासह किमान २४ जण जळून मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. हॉटेल मालकाचे नाव शाहीन चक्कलदार असे असून झबीर इंटरनॅनशनल असे हॉटेलचे नाव आहे. जमावाने सोमवारी रात्री या हॉटेलला आग लावली.

बांगलादेशची संसद बरखास्त

बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी देशाची संसद बरखास्त केली. त्यामुळे अंतरिम प्रशासन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षांनी पार्लमेंट बरखास्त केल्याचे अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘बांगभवन’च्या प्रवक्त्याने सांगितले. अध्यक्षांनी तीनही सशस्त्र दलांचे प्रमुख, विविध राजकीय पक्षांचे नेते, नागरी दलांचे प्रतिनिधी आणि भेदभावविरोधी विद्यार्थी चळवळीच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पार्लमेंट बरखास्त करण्याचा निर्णय घेतला, असे अध्यक्षांच्या निवासस्थानातून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. लवकरच पूर्ण क्षमतेचे अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. पार्लमेंट बरखास्त करण्यात आल्याने नव्याने निवडणुका घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

तोपर्यंत वास्तव्याची मुभा

आपण कोणत्या देशामध्ये आश्रय घ्यायचा याबाबतचा अंतिम निर्णय घेईपर्यंत शेख हसीना यांना भारतामध्ये वास्तव्याची मुभा देण्यात आली आहे, असे कळते.

logo
marathi.freepressjournal.in