लासलगाव : भारतातील प्रमुख कांदा आयातदार देश असलेल्या बांगलादेशात कांद्याचे दर तब्बल १०० रुपये किलोच्या घरात पोहोचल्याने तेथील ग्राहकांना महाग कांदा खरेदी करावा लागत आहे. दरम्यान, लासलगावमधील कांदा बाजारात कांद्याचे भाव केवळ १३ ते १७ रुपये प्रति किलो असल्याने भारतीय कांदा शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन्ही देशांतील दरांत तब्बल ६ ते ८ पट फरक निर्माण झाल्याने लासलगावमधील कांदा निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे तातडीने बांगलादेशातील आयातबंदी हटविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
लासलगावमध्ये कांद्याचे दर तळाला गेले असताना बांगलादेशातील बाजारात भाव शंभरी पार गेले आहेत. या दरफरकामुळे भारतीय शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. निर्यात बंद असल्याने उत्पादनाचा दाब पूर्णपणे देशांतर्गत बाजारावर येत असून दर घसरत आहेत.
केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा
लासलगावमधील व्यापारवर्ग व शेतकरी म्हणतात की, केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करून आयातबंदी उठविण्यासाठी राजनैतिक स्तरावर काम करावे. नाशिक जिल्ह्यातील खासदारांनी संयुक्तपणे केंद्राकडे पाठपुरावा वाढवावा. वाढते दर आणि शेजारी देशातील मागणी लक्षात घेता भारतीय शेतकऱ्यांना हक्काचा बाजार उपलब्ध करून द्यावा. प्रवीण कदम यांच्या या मागणीला शेतकरी आणि व्यापारवर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून केंद्र सरकारने आता तातडीने पावले उचलावीत, अशी सर्वांची एकमुखी अपेक्षा आहे.
बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयातदार देश आहे. परंतु आयातबंदी जवळपास वर्षभर कायम आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना निर्यातीची संधी मिळत नाही आणि बाजारातील दर स्थिर राहत नाहीत. त्यांच्या मते, आयातबंदी हटली तर भारतीय कांद्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना किमान २ ते ५ रुपये प्रति किलो दरवाढ मिळू शकते.त्यामुळे बाजारातील स्थैर्य वाढेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. - प्रवीण कदम, व्यापार संचालक व कांदा निर्यातदार. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती