

ढाका : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका निवृत्त हिंदू शिक्षकासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ६५ वर्षीय गणपती चक्रवर्ती, त्यांची पत्नी प्रितीलता (५०), मुलगी आगामी (२३) आणि मुलगा प्रियम (१२) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुग्धो आणि सिद्धार्थ या दोन चुलत भावांना ताब्यात घेतले आहे.
रंगपूर महानगर पोलीस आयुक्त मोहम्मद अब्दुल माबुद यांनी सांगितले की, “गुरुवारी रात्री संशयित आरोपी शेजारच्या इमारतीवरून चक्रवर्ती यांच्या छतावर जाऊन ‘याबा’ नावाचे अंमली पदार्थ घेत होते. आवाज ऐकून गणपती चक्रवर्ती छतावर गेले असता, आरोपींनी त्यांच्या गमछ्यानेच त्यांचा गळा आवळला. त्यानंतर पत्नीची आणि दोन्ही मुलांचीही गळा आवळून हत्या करण्यात आली.” दासपारा भागातील बंद घरातून शुक्रवारी रात्री या चारही जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.