माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात न्यायालयाने ठरवले दोषी; माजी गृहमंत्र्यांनाही फाशीची शिक्षा

न्यायालयाने शेख हसीना यांना १४०० हून अधिक लोकांच्या हत्येसाठी दोषी ठरवले आहे. त्यांनी ढाका विद्यापीठाच्या कुलगुरूंना फोन करून हत्या करण्याची धमकी दिल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ढाका : बांगलादेशात जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या विरोधात पुकारलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात अनेकांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी मानवतेविरुद्धच्या ५ गंभीर गुन्ह्यांसाठी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने देशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना दोषी ठरविले असून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. शेख हसीना यांच्यासोबतच माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, शेख हसीना यांनी आंदोलकांना भडकावले, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले आणि हत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. आंदोलनाला क्रूरपणे चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे झालेल्या उठावानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन अखेर देश सोडला आणि भारतात आश्रय घेतला.

न्यायालयाने शेख हसीना यांना १४०० हून अधिक लोकांच्या हत्येसाठी दोषी ठरवले आहे. त्यांनी ढाका विद्यापीठाच्या कुलगुरूंना फोन करून हत्या करण्याची धमकी दिल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेल्या सुनावणीनंतर हा निकाल आला आहे. माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना दोनपैकी एका प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल-मामून यांनी सरकारी साक्षीदार बनून सर्व सत्य न्यायालयासमोर उघड केल्यामुळे एका प्रकरणात त्यांना माफी देण्यात आली आहे. शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध ८,७४७ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यात पीडितांचे जबाब आणि जप्त केलेल्या पुराव्यांचा समावेश आहे. याच पुराव्यांच्या आधारे ‘आयसीटी’ने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

समर्थक आक्रमक

शेख हसीना यांना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून बांगलादेशमध्ये तणाव वाढला आहे. शेख हसीना यांच्यावर नि:शस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा ठपका ठेवत दोषी ठरवण्यात आले असून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘इंटरनॅशनल क्राइम ट्रिब्युनल’ने (आयसीटी-बीडी) हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्याविरोधात तब्बल ४५८ पानांचा निकाल दिला आहे. दरम्यान, शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हिंसा किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, तर थेट गोळीबार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या अनुषंगाने अनेक ठिकाणी लष्कराच्या तुकड्या आणि पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.

माजी गृहमंत्री असदुज्जमां खान यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर एका माजी पोलीस प्रमुखाला सरकारी साक्षीदार बनल्यानंतर पाच वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या निकालापूर्वी, हसीना यांनी दावा केला होता की हे न्यायालय त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या नियंत्रणाखाली आहे, जे अवामी लीगची प्रतिमा खराब करण्याचा आणि स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

निर्णय एकतर्फी, राजकीय हेतूने प्रेरित - शेख हसीना

शेख हसीना यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला असून, हा निर्णय एकतर्फी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय माझे म्हणणे ऐकून न घेताच देण्यात आला आहे. हा निर्णय एका अशा ट्रिब्यूनलने दिला आहे, जे एका अनिर्वाचित सरकारद्वारे चालवले जात आहे आणि त्यांच्याकडे कोणताही जनादेश नाही. हा निर्णय संपूर्णपणे चुकीचा आहे. शेख हसीना यांनी दावा केला की, हा निर्णय आधीच ठरवलेला होता. ‘इंटरनॅशनल क्राइम ट्रिब्युनल’मध्ये आंतरराष्ट्रीय असे काहीच नाही. न्यायाधिकरणाने केवळ अवामी लीगच्या सदस्यांवरच खटला चालवला, तर राजकीय विरोधकांनी केलेल्या कथित हिंसेकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही हसीना यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in