

ढाका : बांगलादेशातील हिंसाचाराचा उद्रेक आणि अशांतता दिवसेंदिवस वाढत चालली असून स्थानिक नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर आता अजून एका नेत्याची हत्या करण्यात आली आहे.
शेख हसीना सरकारला उलथून टाकणाऱ्या जुलै महिन्यातील उठावाचे नेतृत्व करणाऱ्या नॅशनल सिटिझन पार्टी (एनसीपी) च्या संलग्न कामगार संघटनेचे, जातीय श्रमिक शक्तीचे नेते मोतालेब शिकदर यांची खुलना शहरात दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना हादी यांच्यावरील हल्ल्याची आठवण करून देणारी होती.
बांगलादेशी दैनिक 'प्रथम आलो'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना सोमवारी सकाळी ११:४५ च्या सुमारास शहराच्या सोनाडांगा भागातील एका घरात घडली. मोतलेब शिकदर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा ते खुलना येथे पक्षासाठी एका विभागीय कामगार रॅलीचे आयोजन करण्यावर काम करत होते, जी लवकरच होणार होती. गंभीर जखमी अवस्थेत सिकंदरला खुलना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. हा हल्ला शरीफ उस्मान हादी याच्या हत्येच्या पद्धतीशी साधर्म्य राखणारा असल्याचे सांगितले जात आहे. हादी याचीही डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती.
राजकीय पार्श्वभूमी
‘एनसीपी’ ही माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनानंतर स्थापन झाली आहे. या पक्षात हसीनाविरोधी आंदोलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील आहेत. ढाका विद्यापीठातील अनेक विद्यार्थी या पक्षाशी जोडलेले आहेत. बांगलादेशमध्ये ‘एनसीपी’ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ‘एनसीपी’ला शेख हसीना यांची कट्टर विरोधी पार्टी मानले जाते. पक्षाशी संबंधित नेते नाहिद इस्लाम यांनी याआधी शेख हसीना यांच्यावर तीव्र टीका केली होती. नाहिद हे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि अंतरिम सरकारमध्ये सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
हादी हत्येनंतर हिंसाचार वाढला
शिकदर याच्यापूर्वी इंकलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी याची डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आली होती. उपचारासाठी त्याला सिंगापूरला नेण्यात आले होते, मात्र तिथे मृत्यू झाला. हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये हिंसक निदर्शने उसळली. शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनात हादीची भूमिका महत्त्वाची होती. बांगलादेशमध्ये घडत असलेल्या या घटनांमुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, आगामी काळात परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.