बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर टीकाकार शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर गुरुवारी रात्रीपासून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलन उफाळून आले असून आघाडीच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले आणि जाळपोळ करण्यात आली आहे. वृत्तकक्षातील कर्मचाऱ्यांना आधीच फोनवरून इशारा देण्यात आला होता की जमाव कार्यालयाकडे येत आहे. कर्मचारी खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच...
बांगलादेशात पुन्हा तणाव! शेख हसीनांच्या कट्टर टीकाकाराच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना पेटवले
बांगलादेशात पुन्हा तणाव! शेख हसीनांच्या कट्टर टीकाकाराच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना पेटवलेछाया सौजन्य - पीटीआय
Published on

ढाका : बांगलादेशातील युवा नेते आणि पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर टीकाकार शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर गुरुवारी रात्रीपासून देशात मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरली आहे. राजधानी ढाक्यात हिंसक आंदोलन उफाळून आले असून आघाडीच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले आणि जाळपोळ करण्यात आली. यात अनेक पत्रकार आणि कर्मचारी जळत्या इमारतींमध्ये अडकून पडले.

३२ वर्षीय शरीफ उस्मान हादी यांचे गुरुवारी सिंगापूरमधील रुग्णालयात निधन झाले. १२ डिसेंबर रोजी मोटारसायकलवरून आलेल्या मुखवटाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारांसाठी परदेशात हलवण्यात आले होते.

हा गोळीबार २०२४ विद्यार्थी चळवळीनंतर बांगलादेशात होणाऱ्या पहिल्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात झाला होता. या निवडणुकीत हादी हे अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याच्या तयारीत होते.

हादीच्या मृत्यूनंतर संतप्त निदर्शने; कार्यालयांना आग

हादी यांच्या मृत्यूची बातमी गुरुवारी उशिरा आणि शुक्रवारी पहाटे पसरताच शेकडो समर्थक ढाक्याच्या रस्त्यांवर उतरले. ‘न्याय द्या’ आणि आरोपींना अटक करा, अशी मागणी करत आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.

अग्निशमन व नागरी संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानुसार, राजधानीत किमान तीन ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. यात बांगलादेशातील आघाडीची वृत्तपत्रे द डेली स्टार आणि प्रथम आलो यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. आंदोलकांच्या गटांनी दोन्ही वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये घुसखोरी करत तोडफोड केली आणि नंतर इमारतींना आग लावली. आगीमुळे कार्यालयांमध्ये धूर भरला आणि अनेक पत्रकार आत अडकले.

‘मला श्वास घेता येत नाही’

द डेली स्टारच्या पत्रकार झायमा इस्लाम यांनी जळत्या इमारतीत अडकले असताना फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली. “मला आता श्वास घेता येत नाहीये. खूप धूर झाला आहे. मी आत अडकले आहे. तुम्ही मला मारत आहात,” असे त्यांनी लिहिले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहाटे १.४० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र त्या वेळीही २७ कर्मचारी इमारतीत अडकले होते. “आम्ही इमारतीच्या मागील बाजूला आश्रय घेतला होता. बाहेर आंदोलकांच्या घोषणांचे आवाज ऐकू येत होते,” असे डेली स्टारचे पत्रकार अहमद दीप्तो यांनी AFP ला सांगितले.

bdnews24 नुसार, वृत्तकक्षातील कर्मचाऱ्यांना आधीच फोनवरून इशारा देण्यात आला होता की जमाव कार्यालयाकडे येत आहे. कर्मचारी खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच खालच्या मजल्यांवर तोडफोड करून आग लावण्यात आली. रात्रीच्या शिफ्टमधील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी छतावर पळाले. तब्बल चार तासांच्या बचावकार्यांनंतर किमान २५ पत्रकारांची सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाने शिड्यांच्या मदतीने लोकांना बाहेर काढले, तर नंतर लष्करालाही परिसरात तैनात करण्यात आले. “शेकडो लोक येथे जमले होते आणि त्यांनी हल्ला केला,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने BBC बांग्लाला सांगितले.

माध्यम संस्थांनाच का लक्ष्य?

दोन्ही माध्यमे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांना मवाळ पाठिंबा देत असल्याचे मानले जाते. तरीही त्यांनाच लक्ष्य का करण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

दरम्यान, दूरदर्शनवरून राष्ट्राला संबोधित करताना युनूस यांनी शुक्रवारी मशिदींमध्ये विशेष प्रार्थना आणि शनिवारी राष्ट्रीय शोकदिन जाहीर केला. “हादी यांचे निधन ही देशासाठी भरून न येणारी हानी आहे,” असे ते म्हणाले आणि आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले.

भारतासाठीही चिंता वाढली

हिंसाचाराचा फटका केवळ माध्यम संस्थांपुरता मर्यादित राहिला नाही. स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, शेकडो आंदोलकांनी ढाक्यातील भारतीय उपराजदूतांच्या निवासस्थानाला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधूर फेकून जमाव पांगवला.

याशिवाय, राजधानीबाहेर जाणारा एक महत्त्वाचा महामार्ग अडवण्यात आला, चिटगावमध्ये एका माजी मंत्र्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला आणि ढाक्यातील सांस्कृतिक संस्था छायानटची तोडफोड करण्यात आली.

ढाका विद्यापीठाजवळील शाहबाग चौकात मोठी गर्दी जमली होती. “तू कोण, मी कोण – हादी, हादी” अशा घोषणा दिल्या जात होत्या. AFP नुसार, जातीया छात्र शक्ती आणि नॅशनल सिटिझन पार्टी (NCP) या विद्यार्थी संघटनाही आंदोलनात सहभागी झाल्या.

NCP नेते सरजिस आलम यांनी हादी यांचे हल्लेखोर भारतात पळून गेल्याचा आरोप करत, त्यांना परत पाठवले जाईपर्यंत ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालय बंद ठेवण्याची मागणी केली.
“जोपर्यंत हादी भाईंचे मारेकरी भारतातून परत येत नाहीत, तोपर्यंत भारतीय उच्चायुक्तालय बंद राहील. आता किंवा कधीच नाही. आम्ही युद्धात आहोत,” असे त्यांनी AFP ला सांगितले.

हिंदू तरुणाला मारहाण करून ठार मारले

दरम्यान, बीबीसी बांग्लाच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी रात्री बांगलादेशमध्ये संतप्त जमावाने धर्माचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका हिंदू व्यक्तीला मारहाण करून ठार मारले. दिपू चंद्र दास असे मृताचे नाव असून तो एका कापड कारखान्यातील कामगार होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ठार मारल्यानंतरही जमावाने त्याचा मृतदेह झाडाला बांधला आणि जाळून टाकला. नंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मैमनसिंग मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in