स्त्रीशिवाय बाळाला जन्म देणे शक्य

जपानी संशोधकांनी नर उंदरांपासून तयार केले स्त्रीबीज
स्त्रीशिवाय बाळाला जन्म देणे शक्य

मादीशिवाय पुनरुत्पादनाची कल्पनाच आपण करू शकत नाही. किंबहुना हे शक्यच नाही, असा आजवर आपला समज होता. तंत्रज्ञानाने मात्र हा समज फोल ठरवला आहे. जपानच्या क्यूशू विद्यापीठातील प्रा. कत्सुहिको हयाशी यांच्या नेतृत्वाखालील १५ वैज्ञानिकांच्या चमूने नर उंदरापासून स्त्रीबीज तयार करण्यात यश मिळवले आहे. जगाला चकित करणाऱ्या या संशोधनामुळे प्रजनन-जीवशास्त्राच्या अभ्यासात प्रगतीचा एक मोठा पल्ला गाठल्याचे मानले जात आहे. ‘नेचर’ या विज्ञान संशोधन नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रकाशित झाली आहे. हे संशोधन समलिंगी पुरुष जोडप्यांना किंवा एकल पुरुषाला महिलेचे गर्भाशय न वापरता पिता होण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकते.

जपानी संशोधकांनी या प्रयोगासाठी नर उंदराच्या शेपटीच्या त्वचेमधील मूलपेशी वेगळ्या केल्या. पुरुषांमध्ये असणाऱ्या पेशीशी या मिळत्याजुळत्या असून, त्यात एक्स आणि वाय गुणसूत्रे अंतर्भूत असतात. या पेशींमधून प्लुरीपोटेन्ट स्टेम सेलची (मूलपेशी) निर्मिती करण्यात आली. प्लुरीपोटेन्ट स्टेम सेल्सच्या माध्यमातून प्राणी किंवा मानवी शरीरातील इतर पेशींची निर्मिती करणे शक्य होत असते. स्टेम सेल्स या आपल्या शरीरातील मूळ पेशी असून, त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या इतर पेशींची निर्मिती होत असते. शरीरातील एखाद्या अवयवाचे नुकसान झाले असेल, तर मूळ पेशींच्या मदतीने पुन्हा एकदा त्या अवयवाची निर्मिती करता येऊ शकते.

या पेशी निर्माण करताना वैज्ञानिकांच्या लक्षात आले की, या पेशीमधील वाय गुणसूत्राची टक्केवारी कमी होऊन त्या ठिकाणी ‘एक्सओ’ या पेशीची निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. वैज्ञानिकांनी एक्सओ या पेशींवर प्रयोगशाळेत रिव्हरसीन या औषधाचा वापर करत पेशींमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले. या निरीक्षणातून लक्षात आले की, एक्स गुणसूत्रासारखी हुबेहूब गुणसूत्रे तयार होत असून, त्या माध्यमातून एक्सएक्स गुणसूत्राची नवी रचना या पेशींमध्ये तयार होत आहे.

लंडन येथे फ्रान्सिस क्रिक संस्थेने आयोजित केलेल्या तिसऱ्या ‘जागतिक ह्युमन जिनोम एडिटिंग’ या परिषदेत प्रा. हयाशी यांनी आपले संशोधन सादर केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही संशोधनातून एक्स गुणसूत्रासारखे हुबेहूब असणारे गुणसूत्र तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’’ मूळ पेशींचा वापर करून अंडकोषनिर्मिती करण्याचा प्रयत्न प्रा. हयाशी आणि त्यांच्या चमूने केला. त्यानंतर दुसऱ्या नर उंदराच्या शुक्राणूंशी त्याचा संयोग घडवून आणण्यात आला. त्यानंतर मादी उंदराच्या गर्भाशयात परिपक्व अंडाशय प्रत्यारोपित करण्यात आले. या संशोधनात ६३० गर्भ प्रत्यारोपणे करण्यात आली. त्यापैकी केवळ सात पिल्ले जन्माला आली. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पिल्लांचे आयुष्यमान हे सामान्य उंदराप्रमाणेच असेल. तसेच प्रौढावस्थेत ते त्यांच्या पिल्लांना जन्म देण्यास सक्षम असतील.

संशोधन अजूनही परिपूर्ण नाही

या प्रयोगात जेवढ्या संख्येने मादी उंदरांचा सरोगसीसाठी वापर झाला, तेवढ्या प्रमाणात पिल्ले जन्माला आलेली नाहीत, याकडे इतर वैज्ञानिकांनी लक्ष वेधले आहे. स्कॉटलंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातील प्रजनन-जीवशास्त्रज्ञ इव्हलिन टेल्फर यांनी या संशोधनाबाबत सांगितले, “या संशोधनात जपानी वैज्ञानिकांना अनेक बीजांडे तयार करण्यात नक्कीच यश आले, पण यातील बहुतेक बीजांडे ही पूर्णपणे सक्षम नसल्याचे दिसते. यापैकी अतिशय कमी बीजांडांमध्ये शुक्राणूंचे फलन होऊन गर्भ तयार होत असल्याचे दिसले आहे. हे संशोधन प्रजोत्पादनाच्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा नक्कीच आहे. पण, मूल पेशीतून जे इतर कृत्रिम अवयव तयार होत आहेत, त्यात थोडीशी अडचण दिसत आहे. त्यावर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे.’’

"दोन नर उंदरांपासून पिल्लाला जन्म दिल्यानंतर या संशोधनात केवळ एक टक्का यश मिळाले आहे. हा प्रयोग मनुष्यावर करण्यासाठी अजूनही दशकभराचा अवधी लागू शकतो. हा प्रयोग यशस्वी झाला तरी पुरुष पेशीतील अंडकोष बाळाला जन्म देण्यासाठी कितपत उपयुक्त ठरतील, हेदेखील अद्याप ठामपणे आम्हाला सांगता येणार नाही."

- प्रा. कत्सुहिको हयाशी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in